वाल्मीक कराडने निरोप दिला अन् 'या' हॉटेलवर रचला गेला संतोष देशमुखांच्या हत्येचा कट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 20:35 IST2025-03-01T20:32:26+5:302025-03-01T20:35:30+5:30
Walmik Karad news marathi: दोन कोटींची खंडणी त्यानंतर दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुख हत्या या सगळ्यात वाल्मीक कराड मुख्य आरोपी असल्याचे तपासातून समोर आले आहे.

वाल्मीक कराडने निरोप दिला अन् 'या' हॉटेलवर रचला गेला संतोष देशमुखांच्या हत्येचा कट!
Walmik Karad news Update: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या गोष्टीची सगळ्यांना प्रतिक्षा होती, ते आरोपपत्र अखेर दाखल करण्यात आले आहे. सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासातून ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्याने खळबळ माजली आहे. आतापर्यंत वाल्मीक कराड याच्यावर दोन कोटींची खंडणी मागितल्याचेच आरोप होते. पण, तपासात वाल्मीक कराडच या सगळ्यातील म्होरक्या असल्याचे समोर आले.
संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी काय घडलं, वाल्मीक कराडशी बोलणं झाल्यावर सुदर्शन घुले कुणाला भेटला आणि त्यानंतर देशमुख यांचे अपहरण करताना कोण कोण होते, याबद्दलची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे.
२९ नोव्हेंबरला वाद झाल्यावर संतोष देशमुखांना धमकी
२९ नोव्हेंबर २०२४ रोजी आवादा कंपनीच्या आवारात वाद झाला होता. काम थांबवण्यात आले. ते थांबवू नका, असे संतोष देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर विष्ण चाटे हा वारंवार संतोष देशमुख यांना कॉल करून खंडणीच्या आड येऊ नको. वाल्मीक अण्णा कराड तुला जिवंत सोडणार नाही, अशी देत होता. याबाबत संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितले.
७ डिसेंबर : वाल्मीक कराडचा सुदर्शन घुलेला मेसेज
"७ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले याने वाल्मीक कराडला कॉल केला. त्यावेळी वाल्मीक कराडने सुदर्शन घुले याला सांगितले की, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण भिकेला लागू. असेच होत राहिले तर आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. त्यामुळे संतोष देशमुख आडवा येत असेल, तर त्याला कायमचा धडा शिकवा."
वाल्मीक कराडशी बोलणं झाल्यावर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या कार्यालयात कॉल केला आणि धमकी दिली.
८ डिसेंबर : विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि गोपनीय साक्षीदार भेटले
आरोपपत्रानुसार, ८ तारखेला सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि एक गोपनीय साक्षीदार यांची नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये भेट झाली. त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुलेला वाल्मीक कराडचा निरोप सांगितला.
गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, तिरंगा हॉटेलमध्ये जी बैठक झाली. तिरंगा हॉटेलमध्येच संतोष देशमुख यांना मारण्याचा कट शिजला.
संतोष देशमुखांचा पाठलाग करून अपहरण
९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी संतोष देशमुख यांची केज आणि मस्साजोग रस्त्यावर असलेल्या उमरी टोलनाका येथे टाटा इंडिगो गाडी थांबवली आणि अडवून त्यांचं अपहरण केलं.
सुदर्शन घुलेच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून चिंचोली टाकळीकडे घेऊन जात असताना अमानुष मारहाण करण्यात आली. ३.३० ते ६.३० वाजेपर्यंत मारहाण करण्यात आली.
हत्या केल्यानंतर कुठे फेकला होता मृतदेह?
सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना मारहाण करताना एक व्हिडीओ कॉल सुरू होता. जयराम चाटेने एका व्हॉट्स अप ग्रुपवर हा कॉल केला होता. तोच पुरावा सीडीआयने महत्त्वाचा मानला आहे. आरोपींनी संतोष देशमुख यांना मारण्यासाठी पांढऱ्या रंगाचे पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाईप, काठी यांचा वापर केला. चिंचोली टाकळीकडे नेले. तिथे अमानुष मारहाण केली. त्यांचा खून करून साडेसहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह दैठणा फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले.