राज्यातील ३८ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन थकित!, दिवाळी सण साजरा कसा करायचा हा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:09 IST2025-10-18T13:08:55+5:302025-10-18T13:09:18+5:30
सातारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. राज्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या ...

राज्यातील ३८ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन थकित!, दिवाळी सण साजरा कसा करायचा हा प्रश्न
सातारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. राज्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या ३८ हजारांवर आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणावर दु:खाचे सावट निर्माण झालेले आहे. त्याचबरोबर थकित मानधनासाठी तातडीने जिल्हास्तरावर अखर्चित असणारा १५ वा वित्त आयोगाचा निधी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेकडून आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकता संघाच्या वतीने मागील आठवड्यातच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन ई स्पर्श संगणक प्रणाली कार्यरत करण्याची कार्यवाही राज्यस्तरावरून सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, ही संगणक प्रणाली दिवाळीपर्यंत कार्यान्वित होणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही.
त्यातच या अभियानांतर्गत राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे मानधन थकित आहे. हे मानधन दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यातच प्रत्येक जिल्ह्यात १५ वा वित्त आयोगाचा पुरेसा निधी शिल्लक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे दिवाळी सण, बँक कर्ज हप्ते, दैनंदिन घरगुती तसेच शैक्षणिक खर्चही आहे. हे विचारात घेऊन कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी तातडीने १५ वा वित्त आयोग निधी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे मानधन थकित आहे. राज्यातील ३८ हजारांवर कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे. दिवाळी सण साजरा करणे, बँकांचे कर्ज हप्ते भरणे आदींसह विविध कारणांसाठी हे मानधन तातडीने मिळणे गरजेचे आहे. त्यातच ई स्पर्श प्रणालीतील तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे मानधन मिळेल असे वाटत नाही. यासाठी १५ वा वित्त आयोगाचा निधी पुरेसा शिल्लक आहे. तो वापरण्यास परवानगी देण्याची आवश्यकता आहे. - विजय गायकवाड, राज्याध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकता संघ