Hinganghat Burnt Case : महाराष्ट्रभर आक्रोश आणि संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 04:48 AM2020-02-11T04:48:41+5:302020-02-11T04:49:46+5:30

राज्यभर शोककळा : अनेकांना भावना अनावर; ठिकठिकाणी बंद, गावोगावी श्रद्धांजली

Hinganghat Burnt Case : some people provide tribute | Hinganghat Burnt Case : महाराष्ट्रभर आक्रोश आणि संताप

Hinganghat Burnt Case : महाराष्ट्रभर आक्रोश आणि संताप

Next

हिंगणघाट (वर्धा) : गेल्या सोमवारी नंदोरी चौकात प्राध्यापिका तरुणीवर अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी या प्रकरणातील पीडित तरुणीची प्राणज्योत मावळली. या घटनेची वार्ता पसरताच राज्यभरात तीव्र पडसाद उमटले.


नागपूर येथून पीडिताचा मृतदेह रुग्णवाहिकेतून तिच्या मूळगावी आणण्यात आला. गावशिवेवर रुग्णवाहिका पोहोचताच संतप्त जमावाने रुग्णवाहिकेवर दगडफेक केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी आप्तेष्टांनी भूमिका घेतली. सायंकाळी ५ वाजता वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी शासनाच्या वतीने लेखी आश्वासन दिले.


यात या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासोबतच आरोपीला कठोर शिक्षा, मृत तरुणीच्या भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी, कुटुंबीयाला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन कोरडे यांनी शासनाच्यावतीने दिले. आश्वासनाचा लेखी कागद शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांनी स्मशानभूमीत याबाबतची माहिती वाचवून दाखविली. त्यानंतर अंत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झाला.


पार्थिव गावात येताच रुग्णवाहिका रोखून धरण्याचा प्रयत्न
नागपूर येथील आॅरेंजसिटी रूग्णालयातून ‘ती’चे पार्थिव आल्यानंतर गाववेशीवरच संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिका रोखून धरली. दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना जमाव पांगविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. पोलीस बंदोबस्तात पार्थिव घरी आणले. तेव्हा कुटुंबीय, आप्तेष्टांसह साऱ्यांनाच अश्रू अनावर झाले.


आरोपीचे कुटुंबीय अज्ञातवासात

३ फेब्रुवारीला घडलेल्या अमानवीय घटनेनंतर गावातील संतप्त वातावरणाचा अंदाज लक्षात घेऊन आरोपीचे आई-वडील आणि बहीण ४ फेब्रुवारीलाच सायंकाळी बाहेरगावी आपल्या नातेवाइकांकडे रवाना झाले आहे. त्यांचे घर कुलूपबंद आहे. सुरुवातीला आरोपीचे कुटुंबीय येथेच राहण्याच्या मानसिकतेत होते. दरम्यान गावातही शांतता होती. नंतर इतरत्र जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
रुग्णवाहिकेवर फुले फेकून वाहिली श्रद्धांजली
नागपूर येथून गावाकडे तिचे पार्थिव आणले जात असताना वाटेत शेकडोंच्या संख्येत असलेल्या शोकमग्न नागरिकांनी रूग्णवाहिकेवर फुले फेकून तिला श्रद्धांजली अर्पण केली.
‘ती’ची शैक्षणिक वाटचाल
हिंगणघाट तालुक्यातील छोट्याशा गावातून शैक्षणिक भरारी घेणारी प्राध्यापिका गावातील अनेकांसाठी आदर्श होती. शेतकरी कुटुंबात वाढलेली आणि कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर तिने अध्यापन क्षेत्रात आली होती. तिच्या शैक्षणिक जीवनात सोबत राहिलेल्या शिक्षकांसह मित्र-मैत्रिणींच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळले.
तिचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदच्या शाळेतून झाले. त्यानंतर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण तिने हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातून घेतले. बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने बी.एस्सीचे शिक्षण हिंगणघाटच्या रा. सु. बिडकर महाविद्यालयातून घेतले. एम.एस्सीकरिता तिने वर्ध्यातील जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय गाठले. येथेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर येळाकेळीच्या अध्यापक महाविद्यालयातून बी.एडचे शिक्षण घेऊन अलीकडचे काही दिवसांपासून हिंगणघाटच्या महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून रुजू झाली होती.
खटला प्राधान्याने, वेगाने चालविणार
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राध्यापिकेवर भररस्त्यात पेट्रोल ओतून जिवंत पेटवून देण्याचे हे प्रकरण अतिशय क्रूर अन् गंभीर आहे. त्यामुळे हा खटला प्राधान्याने चालवायचा आहे. मात्र, प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर झाल्यानंतरच आपली भूमिका सुरू होणार आहे, असे मत सुप्रसिद्ध विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी मांडले.
खटल्याच्या संबंधाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी सोमवारी अ‍ॅड. निकम यांची चर्चा झाली. या चर्चेचा सूर काय होता, ते जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने अ‍ॅड. निकम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लोकमतजवळ उपरोक्त प्रतिक्रिया नोंदवली.
अ‍ॅड. निकम म्हणाले, पोलीस या प्रकरणाचा तपास पूर्ण करून लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करतील. तत्पूर्वीची कायदेशीर प्रक्रिया वेगात मात्र निकोपपणे पार पाडली जाणार आहे. खटल्याच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर आपण आपली भूमिका पार पाडू.
पीडितेच्या वडिलांशी बोलणी
अ‍ॅड. निकम यांनी पीडितेच्या वडिलांशीही फोनवरून संवाद साधला. या प्रकरणात आपण कायदेशीर लढाई लढून नक्की न्याय मिळवू, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Hinganghat Burnt Case : some people provide tribute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.