मुंबई - राज्यात पहिलीच्या वर्गापासून हिंदी सक्तीविरोधात मराठी भाषा प्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. त्यात ठाकरे बंधूंनी एकत्रित येत सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चाची हाक दिली होती. येत्या ५ जुलैला हा मोर्चा होणार होता परंतु त्याआधीच हिंदीबाबत सरकारकडून काढलेले दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे मोर्चा आधीच सरकारने घेतलेला निर्णय हा मराठी माणसांचा विजय असल्याचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मात्र ५ जुलैला मोर्चाऐवजी विजयी मेळावा घेण्याचं या दोन्ही पक्षांनी ठरवले.
वरळी डोम येथे ५ जुलैला ठाकरे बंधू यांच्या नेतृत्वात मराठी भाषिकांचा विजयी मेळावा घेतला जाणार आहे. त्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित आवाहन केलेले पत्रक खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले. या पत्रकात म्हटलंय की, मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का, तर हो नमवलं. कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे..वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय असं उल्लेख करत आपले नम्र राज ठाकरे-उद्धव ठाकरे असं पत्रकावर छापण्यात आले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
विजयी मेळाव्याबाबत संजय राऊत म्हणाले की, माझं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर वरळी येथे डोम सभागृहात हा मेळावा करावा असं ठरले. हा विजयी मेळावा शिवतीर्थावर व्हावा यासाठी आम्ही अर्ज दिला होता. अनिल परब त्यासाठी प्रयत्न करतायेत. परंतु हे सरकार आम्हाला ती परवानगी देणार नाही हे माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय दिला तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारला. या मेळाव्याबाबत आमची बैठकही झाली. कार्यक्रमाचे स्वरूप काय असावे, किती माणसे येतील यावर प्राथमिक चर्चा केली. ५ जुलैला साधारण १२ ते १२.३० च्या सुमारास हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे-राज ठाकरे उपस्थित असतील. ठाकरे एकत्र दिसतील याबाबत शंका आणि दुमत असण्याचे कारण नाही असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय या लढ्यात जे सहभागी झाले मग ते काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते असतील, डावे पक्ष असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. महाराष्ट्राची एकजूट ही राजकीय मतभेद, पक्षांच्या पलीकडे आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीने अघोरी कायद्याच्या आधारे, सत्तेचा वापर करत हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उसळून उभा राहिला हेच आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना दाखवून द्यायचे आहे असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.