धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा! कृषी विभागाची 'ती' खरेदी नियमानुसारच झाल्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 19:44 IST2025-07-24T19:43:22+5:302025-07-24T19:44:53+5:30

खोटी याचिका दाखल करणाऱ्या तुषार पडगिलवार यांना एक लाखांचा दंड

High Court gives relief to Dhananjay Munde! Decision that 'that' purchase of the Agriculture Department was done as per the rules | धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा! कृषी विभागाची 'ती' खरेदी नियमानुसारच झाल्याचा निर्णय

धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा! कृषी विभागाची 'ती' खरेदी नियमानुसारच झाल्याचा निर्णय

तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात आरोपांची राळ उठवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन चुकीचे आरोप करण्यात आले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी राज्य मंत्रिमंडळाची रीतसर मान्यता घेऊनच शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धोरणात्मक निर्णय घेऊन सदर प्रक्रिया राबवली, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी:

राज्य शासनाने १२ मार्च २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, बॅटरीवर चालणारे स्प्रेयर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, मेटाल्डिहाईड कीटकनाशक व कापूस साठवणीसाठी बॅग्स यांसारख्या पाच वस्तू शेतकऱ्यांना थेट खरेदी करून महाराष्ट्र अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MAIDCL) व महाराष्ट्र स्टेट पॉवरलूम कॉर्पोरेशन (MSPCL) यांच्यामार्फत पुरवण्याचे नियोजन करण्यात आले होते. या निर्णयावरून धनंजय मुंडे यांच्या नावाने घोटाळा हा शब्द वापरून अनेकांनी मुंडेंची व कृषी विभागाची बदनामी केली होती. या निर्णयाला विरोध करताना Agri Sprayers TIM Association व उमेश भोळे यांच्यासह तीन शेतकऱ्यांनी स्वतंत्र याचिका व जनहित याचिका दाखल करून या वस्तूंना थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेतून वगळण्यास विरोध दर्शवला होता.

राज्य शासनाची बाजू:

राज्य शासनाने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की, २०१६ मधील DBT योजना व २०२३-२४ मधील विशेष कृती आराखडा ही दोन्ही योजना स्वतःच्या स्वरूपात वेगळी असून त्यांची उद्दिष्टे ही केवळ शेतकऱ्यांचे हीत एवढेच आहेत. विशेष कृती आराखड्याचा उद्देश शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर पीक उत्पादन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके यांचा समावेश असलेले सर्वांगीण पाठबळ देणे हा आहे व तो पूर्णपणे योग्य आहे. शासनातर्फे ॲड. अंतुरकर, ॲड. व्यंकटेश दौंड, ॲड. कुंभकोनी यांनी बाजू मांडली.

न्यायालयाचा निर्णय:

न्यायालयाने नमूद केले की DBT योजना व विशेष कृती आराखडा यांचा एकमेकांशी संबंध नाही. शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले असून त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. लेखी याचिका ३२६०/२०२४ फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट केले की याचिकाकर्ते केवळ आपल्या व्यवसायाच्या हितासाठी न्यायालयात आले आहेत. तसेच या प्रकरणाचा वापर करून अनेकांनी शासनाच्या तत्कालीन धोरणावर चुकीचे भाष्य करून बदनामी साध्य केली. PIL क्र. २५/२०२५ हीसुद्धा न्यायालयाने “खाजगी व्यावसायिक हेतू” असल्याचे म्हणत फेटाळली आहे. विशेषतः याचिकाकर्ते तुषार पाडगिलवार यांनी न्यायालयीन प्रक्रियांचा गैरवापर करत "फोरम शॉपिंग" केल्याबद्दल ₹1 लाख दंड ठोठावण्यात आला. हा दंड ४ आठवड्यांत हायकोर्ट विधी सेवा प्राधिकरणाकडे भरावा लागेल; अन्यथा संबंधित जिल्हाधिकाऱ्याद्वारे भूमिकराप्रमाणे वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.

याचिकाकर्त्यांची खोटी भूमिका उघड- मुंडेंचे वकील

विशेष म्हणजे, स्प्रेयर निर्माते तुषार पडगीलवार यांनी स्वतःच्या खाजगी हितासाठी प्रथम मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, पण निर्णय विरोधात जाईल हे लक्षात येताच त्यांनी मुख्य मागण्या मागे घेतल्या. त्यानंतर त्यांनी नागपूर न्यायालयात जनहित याचिकेच्या  नावाखाली काही शेतकऱ्यांना पुढे करत खोटे बिल्स व खोटे पुरावे दाखवून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यावरही न्यायालयाने भाष्य केले आहे. या निर्णयामुळे राज्य शासनाच्या कृषी उत्पन्नवाढीच्या विशेष कृती आराखड्याला न्यायालयीन मान्यता मिळाली आहे.  तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राबवलेली ही थेट खरेदी प्रक्रिया पारदर्शक व शेतकऱ्यांच्या हितास पूरक असल्याचे निकालात नोंदवले आहे. त्यामुळे या विषयाच्या आडून धनंजय मुंडे यांची बदनामी करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने जोरदार चपराक लगावली आहे; असेच म्हणावे लागेल.

सत्यमेव जयते- धनंजय मुंडे

दरम्यान, शेतकरी वर्गास उत्पन्न वाढीच्या दृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा विचार करून शेतकऱ्यांच्या हीतास प्राधान्य देणारा धोरणात्मक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याच्या विरोधात अनेकांनी माझ्यावर आरोप करून माझी बदनामी केली; मात्र आज न्याय देवतेने सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला असून आपला तो निर्णय योग्यच होता, असे म्हणत सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया या निकालावर व्यक्त केली आहे.

Web Title: High Court gives relief to Dhananjay Munde! Decision that 'that' purchase of the Agriculture Department was done as per the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.