Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:52 IST2026-04-09T11:50:57+5:302026-04-09T11:52:23+5:30
Rohit Pawar on Baramati By Election 2026: काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, असे आवाहन रोहित पवार यांनी केले. यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली.

Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
Rohit Pawar News: अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचे आकाश मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर आता रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली.
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणे ही अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येकाची आणि तमाम बारामतीकरांची इच्छा आहे. अजितदादांची बहुतांश राजकीय कारकिर्द ही काँग्रेसमध्ये आणि नंतर काँग्रेससोबत गेली. या काळात काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध राहिला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची मुंबईत भेट घेतली आणि अजितदादा, त्यांचे काम आणि त्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध बघता काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती त्यांना केली, अशी माहिती रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून दिली.
या विनंतीचा हे सर्वजण आदर ठेवतील
अजितदादांसारख्या एका प्रमुख नेत्याच्या अपघाताचा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल अशा सरकारविरोधात संघर्ष का करु नये? असा स्पष्ट विचार त्यांनी यावेळी मांडला. त्यांच्या या विचारांचा आणि त्यांच्या पक्षाच्या धोरणाचा आदर आहे. पण तरीही काँग्रेससह अर्ज दाखल केलेल्या इतरही सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊन सुनेत्राकाकी यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करावे, अशी माझी या सर्वांना विनंती आहे आणि या विनंतीचा हे सर्वजण आदर ठेवतील, असा विश्वास आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्युनंतर बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लागली आहे. यापूर्वी अजितदादांनी कॉंग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आपल्या पक्षासोबत त्यांचे नेहमीच सौहार्दाचे संबंध होते. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणे ही अजितदादांना आदरांजली ठरेल. तरी माझी कॉंग्रेस पक्षाला नम्र विनंती आहे की कृपया आपण आपला उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणं ही अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येकाची आणि तमाम बारामतीकरांची इच्छा आहे. अजितदादांची बहुतांश राजकीय कारकिर्द ही काँग्रेसमध्ये आणि नंतर काँग्रेससोबत गेली. या काळात काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याशी त्यांचा अत्यंत निकटचा… pic.twitter.com/aRiQygb5u7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2026