मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र, राज्यात अद्याप कुठलंही सरकार कार्यरत नसल्याने राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल भगंतसिंह कोश्यारी यांच्याकडेच राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यपालांकडे मागणी केली आहे. याची दखल घेत राज्यपालांनीही शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. 2 हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी 8 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र, ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर, भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी या मदतीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे म्हटले आहे. 

महामहिम राज्यपाल यांचेकडून ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली खरीप पिकांना प्रति हेक्टरी 8 हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या जाहीर झालेल्या मदतीतून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार नसल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी 25 हजार रुपये तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी असून त्यात मशागतीचा खर्चही निघणार नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.

राज्यपालांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की,खरीप पिकांसाठी एकरी 3200 रुपये आणि फळबागांसाठी एकरी 7200 रुपये मदत ही तर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच आहे.

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. मा. राज्यपाल महोदयांनी आज जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रशासनाने पिकांचे सरसकट पंचनामे करायला हवे. राज्यपालांनी कोणत्याही निकषाची अट न घालता, सरकारचे नेहमीचे धोरण बाजूला ठेवत शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, असे धनंजय मुंडेंनी म्हटलंय. या मदतीने पिकांवर झालेला खर्च सुद्धा वसूल करता येणार नाही. अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार आहे. केंद्र सरकारने राज्यात लक्ष घालणे गरजेचे आहे. सरकारला शेतकऱ्यांचे दुःख या जन्मात तरी कळणार आहे का? असा सवालही धनंजय मुंडेंनी विचारला आहे. प्रशासनाने कर्जवसूलीस स्थगिती देऊन कर्जमाफी करावी. परीक्षा शुक्ल नव्हे तर संपूर्ण फी माफ करावी. विजेचे बिल माफ करावे तसेच रब्बीची उचल देण्यासाठी तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंतच्या खरीप पिकांसाठी 8 हजारांची तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची प्रति हेक्टरी मदत घोषित करण्यात आली आहे. राज्यपालांनी जाहीर केलेल्या या मदतीमुळे अवकाळी पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही राज्यपालांकडे मागणी केली होती. राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजारांची प्रतिहेक्टरी मदत तर बागायत शेतीसाठी 18 हजार रुपयांची मदत तात्काळ शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. याशिवाय नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेश देखील राज्यपालांनी दिले आहेत

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: With the help of the governor to farmer, the anger of the all-party leaders, while Pankaja Munde said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.