पूर्व विदर्भात १०, ११ ऑगस्टला अतिवृष्टी; हवामान खात्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 18:23 IST2020-08-08T17:43:57+5:302020-08-08T18:23:44+5:30
ईशान्य बंगालच्या उपसागरात ३.५ ते ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वा-यांमुळे बंगालच्या उपसागरात रविवारी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते.

पूर्व विदर्भात १०, ११ ऑगस्टला अतिवृष्टी; हवामान खात्याचा इशारा
अमरावती : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने १० व ११ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा, तर पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सार्वत्रिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
नैऋत्य (उत्तर)दिशेकडून मोसमी वारे दक्षिणेकडे वाहिल्यास संथ गतीने पाऊस पडतो. तेव्हाच झडसदृश स्थिती राहते. मात्र, यंदा वातावरणातील बदलामुळे दक्षिणेकडून मोसमी वारे ५ ते ६ किमी उंचीवरून वाहू लागल्याने कुठे धो-धो तर कुठे काहीच नाही, अशी स्थिती उद्भवत आहे. त्यामुळे यंदा झडसदृश स्थिती अनुभवता आली नाही, अशी माहिती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली.
ईशान्य बंगालच्या उपसागरात ३.५ ते ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वा-यांमुळे बंगालच्या उपसागरात रविवारी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. सद्यस्थितीत अरबी समुद्र, गुजरात व मध्यप्रदेशवर कमी दाबाचा पट्टा असल्याने तेथे संथपणे पाऊस कोसळत आहे.
सध्या अरबी समुद्रातून नैरूत्य मोसमी वारे सशक्तपणे वाहत असून हा प्रवाह आनखी ४८ तास टिकणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १० व ११ ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भात अतीव्रुष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
१० ते १२ ऑगस्ट दरम्यान विदर्भात सार्वत्रिक पावसाची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जवळपास ७० टक्के भागात पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भात मात्र अतिवृष्टीचा ईशाऱ्यासह १५ ऑगस्टपर्यंत विदर्भात चांगला पाऊस पडण्याची शक्यता बंड यांनी वर्तविली आहे.