पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 05:59 IST2026-04-10T05:58:51+5:302026-04-10T05:59:55+5:30
विदर्भ, मराठवाडा, कोकणाचीही काहिली

पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एप्रिलमधील दिलासादायक दिवस आता संपले असून, कमाल तापमान वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत कमाल तापमान मेच्या सुरुवातीपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळिशी पार जाऊ शकतो.
महामुंबईतील अनेक शहरांत वाढलेल्या तापमानाचा ताप अधिक होणार आहे. तो ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आहे.
पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव
शुक्रवारपासून पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यभर उष्णता वाढू लागेल. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत १० आणि ११ एप्रिल रोजी हवामान उष्ण आणि दमट राहील. तर पुढील ७ ते १० दिवस पश्चिमी हवामानातील तीव्र बदलांमुळे राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
कुठे किती तापमान? अंदाज काय?
मुरबाड, महाड आणि घाटमाथ्यालगतच्या भागांत शनिवारपासून तापमानाचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो. खान्देश, सोलापूर, विदर्भ आणि मराठवाड्यात रविवारपर्यंत तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. मध्य महाराष्ट्र, कोकणातही तापमान वाढणार आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्र, पुण्यासह लगतचे तापमान ३७-३९ दरम्यान राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी वर्तवली.
सोमवारपासून वाऱ्याचा दिशाबदल
सोमवारपासून पुन्हा वाऱ्याची दिशा बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात तापमानात थोडेफार चढ-उतार दिसतील. मात्र, मंगळवारपासून तापमान पुन्हा वाढून आधीच्या पातळीवर पोहोचेल.