‘धनुष्यबाण’, ‘घड्याळ’ चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर; याचिका ३ वर्षांपासून प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 07:17 IST2026-01-22T07:16:13+5:302026-01-22T07:17:04+5:30
चार आठवड्यांत सुनावणी घेणार : सर्वोच्च न्यायालय

‘धनुष्यबाण’, ‘घड्याळ’ चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर; याचिका ३ वर्षांपासून प्रलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित याचिकेवर बुधवारी होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. दोन्ही पक्षांची नावे आणि निवडणूक चिन्हांचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह बऱ्याच याचिकांवर सुनावणी होणार होती. हे प्रकरण न्यायालयात ३७ व्या क्रमांकावर लिस्टेड होते. त्यावर सकाळच्या सत्रात सुनावणी सुरू होऊन ती सलग दोन दिवस चालणे अपेक्षित होते.
मात्र, दुसऱ्या एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी जावे लागत असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले. यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पक्ष व चिन्हाबाबतची ही याचिका ३ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे.
चार आठवड्यांत सुनावणी घेणार : सर्वोच्च न्यायालय
आज ज्या याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही, त्या सर्व याचिकांवर येत्या चार आठवड्यांत सुनावणी घेतली जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. दर सोमवारी चार - पाच याचिकांवर सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले.