'त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे?', सुषमा अंधारेंचे राहुल नार्वेकरांना दोन सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:16 IST2025-02-23T14:15:11+5:302025-02-23T14:16:31+5:30
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, मात्र त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली नसल्याने वाद उभा राहिला आहे.

'त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे?', सुषमा अंधारेंचे राहुल नार्वेकरांना दोन सवाल
धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर विरोधक त्यांची आमदारकी रद्द करण्यासह मंत्रिपदाची मागणी करत आहेत. दरम्यान, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर दोन दिवस उलटले, तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची आमदारकी रद्द केलेली नाही. त्यावरून आता शिवसेनेच्या (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी लक्ष्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी लगेच रद्द होणे अपेक्षित होते. यापूर्वी काही आमदारांना शिक्षा होताच तसा निर्णय झाला होता. मात्र, कोकाटेंच्या निर्णयाबद्दल विलंब होत असल्याने विरोधकांकडून आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लक्ष्य केले जात आहे.
राहुल नार्वेकर यांनी या मुद्द्यावर बोलताना न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतर अपात्रतेच्या संदर्भात कारवाई केली जाईल, असे सांगितले.
सुषमा अंधारेंनी दाखवला न्यायालयाचा आदेश
शिवसेनेच्या (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी राहुल नार्वेकरांच्या विधानाला उत्तर देताना न्यायालयाच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
"माणिकराव कोकाटे प्रकरणांमध्ये नार्वेकर निकालाच्या प्रतीची वाट बघत आहेत मात्र 38पानी निकाल ऑनलाईन उपलब्ध आहे. वकील असणाऱ्या नार्वेकरांना सहजासहजी उपलब्ध होत नसेल तर मी द्यायला तयार आहे. कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार? की त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे?", असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
माणिकराव कोकाटे प्रकरणांमध्ये नार्वेकर निकालाच्या प्रतीची वाट बघत आहेत मात्र 38पानी निकाल ऑनलाईन उपलब्ध आहे. वकील असणाऱ्या नार्वेकरांना सहजासहजी उपलब्ध होत नसेल तर मी द्यायला तयार आहे.
— SushmaTai Andhare (@andharesushama) February 23, 2025
कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार? की त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे ? @rahulnarwekarpic.twitter.com/OuGR1hlKNl
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने १९९५ मधील एका प्रकरणात २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कोकाटे बंधूंनी चार सदनिका लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यात त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले.
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. विधानसभा सचिवालयाकडे आदेशाची प्रत गेल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले होणार आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदही धोक्यात येऊ शकते.