Gram Panchayat Election Result: जिथे नितेश राणेंनी मतदारांना धमकी दिली त्या नांदगाव ग्रामपंचायतीत असा लागला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 15:43 IST2022-12-20T15:39:46+5:302022-12-20T15:43:10+5:30
Gram Panchayat Election Result 2022: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान, मतदारांना धमकी दिल्याने चर्चेत आलेल्या कणकवलीमधील नांदगाव ग्रामपंचायतीचा निकालही समोर आला आहे.

Gram Panchayat Election Result: जिथे नितेश राणेंनी मतदारांना धमकी दिली त्या नांदगाव ग्रामपंचायतीत असा लागला निकाल
राज्यातील सुमारे ७ हजार ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आ सुरू आहे. दरम्यान या मतमोजणीमध्ये सुरुवातीपासून भाजपा आणि शिंदे गटाने आघाडी घेतली आहे. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान, मतदारांना धमकी दिल्याने चर्चेत आलेल्या कणकवलीमधील नांदगाव ग्रामपंचायतीचा निकालही समोर आला आहे. संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये नितेश राणेंचे समर्थन असलेला भाजपा पुरस्कृत सरपंचपदाचा उमेदवार विजयी झाला आहे.
आज झालेल्या मतमोजणीमध्ये नांदगाव ग्रामपंचायतीमधील भाजपाचे सरपंचपदाचे उमेदवार रविराज मोरजकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले. सरपंचपदासोबतच नांदगावमध्ये भाजपा पुरस्कृत ९ सदस्य निवडून आले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला केवळ एक जागा मिळाली आहे.
कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रसारासाठी आले असताना आमदार नितेश राणे यांनी भाजपाचा सरपंच निवडून आला नाही तर एक रुपयाही निधी देणार नाही, असे विधान केले होते. ते म्हणाले होते की, सरपंचपदावर बसले तर त्या पदाला न्याय देईल, अशी व्यक्ती आम्ही सरपंचपदासाठी उमेदवार म्हणून दिली आहे. केवळ नामधारी उमेदवार दिलेला नाही. गावचा विकास करेल, गरज पडल्यास माझ्याशी बोलेल. राणे साहेबांशी बोलेल. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलेल, अशी व्यक्ती आम्ही उमेदवार म्हणून दिली आहे. नांदगाव हे महामार्गाला लागून असलेलं गाव आहे. येथे जेव्हा साईड रोड बनेल तेव्हा दोन्ही बाजूंनी विकास होईल, तेव्हा येथे आपल्या विचारांचा सरपंच असणं आवश्यक आहे. या गोष्टी तुम्ही कार्यकर्ते म्हणून लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवावं म्हणून मी स्पष्टपणे सांगितलं, असा दावा त्यांनी केला होता.