मुंबई - बचत गट वा अन्य मार्गांनी कर्ज घेणाऱ्या महिला १०० टक्के परतफेड करतात, त्या तुलनेने पुरुष परतफेड करत नाहीत, असे सांगून महिला सेवा सहकारी संस्थांना यापुढे सरकारच्या माध्यमातून होणारी कामे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
प्रदेश भाजप महिला आघाडीच्या वतीने आ. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात राज्यभरातील ३६ लाख ७८ हजार भगिनींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या राख्या प्रदान करण्याचा कार्यक्रम येथे झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा मंत्री आशिष शेलार यांचीही यावेळी भाषणे झाली. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. मंदा म्हात्रे आदी यावेळी उपस्थित होते.
भगिनींनी दिलेल्या प्रेमातून मी कधीही उतराई होणार नाही. समाजात ५० टक्के असलेल्या महिलांचा सहभाग आणि विकासाशिवाय देश मजबूत होणे शक्य नाही. महिलांसाठी सुरू असलेल्या सरकारच्या योजनांपैकी एकही बंद केली जाणार नाही. महिलांची प्रगती आता कोणीही थांबवू शकणार नाही. २०२९ मध्ये त्यांचा लोकसभा आणि विधानसभेतही मोठा सहभाग असेल, तेव्हा देश आणि राज्य हे महिलांच्या हुकुमाने चालेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
योजना लवकरच सुरू होणार राज्यात तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली असून या संस्थांच्या फेडरेशनची नोंदणीही झाली आहे. आ. चित्रा वाघ यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा संदर्भ देऊन फडणवीस यांनी या संस्थांना सरकारची विविध कामे/कंत्राटे दिली जातील असे सांगितले. लवकरच ही योजना सुरू होणार आहे.
‘बिहारमध्ये जातात अन् तिथे महाराष्ट्राची बदनामी करतात’पंतप्रधान मोदी नेहमीच सांगतात आणि ही वस्तुस्थिती आहे की महिलांनी आम्हाला नेहमीच मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. मात्र, काहीजण व्होटचोरीचा आरोप करतात. व्होटचोरी नाही त्यांचे डोके चोरी झाले आहे.
आता ते बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. लाडक्या बहिणींच्या मतांना ते चोरी म्हणतात, खरे चोर तर असा आरोप करणारेच आहेत, त्यांच्या डोक्यात थोडी अक्कल येवो, असा हल्लाबोल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवर केला.