DA Hike: राज्य कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 06:43 IST2025-02-26T06:42:42+5:302025-02-26T06:43:01+5:30
Maharashtra DA Hike: महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी सरकारी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात होती.

DA Hike: राज्य कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता आता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के इतका झाला आहे. १ जुलै २०२४ पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे.
महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी सरकारी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात होती. दरम्यान, थेट लाभाच्या विविध योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याच्या चर्चा असतानाही हा निर्णय घेत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिल्याचे मानले जाते.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचेही सांगितले जाते. राज्यातील एकूण १९ लाख शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
थकबाकी कधी?
या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीतील थकबाकी फेब्रुवारीच्या वेतनासोबत रोखीने मिळेल.
किती मिळणार?
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा ४० हजार रुपये मूळ पगार असेल तर ३ टक्के वाढीव भत्त्यासह दरमहा १२०० रुपये अतिरिक्त महागाई भत्ता मिळण्यास सुरुवात होईल. ही वाढ जुलैपासूनच लागू मानली जात असल्याने कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे. अशाप्रकारे त्यांना थकबाकी म्हणून ३६०० रुपये देखील मिळतील.