“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 14:19 IST2025-10-12T14:15:48+5:302025-10-12T14:19:48+5:30
Girish Mahajan News: नाशिकच्या पालकमंत्रीपदावर अद्यापही तोडगा निघालेला नसल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून महायुतीतील नेते टोलेबाजी करताना दिसत आहेत.

“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
Girish Mahajan News: गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावर तोडगा निघताना दिसलेला नाही. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद नेमके कोणाला मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून अनेकविध दावेही केले जात आहेत. यातच दादा भुसे यांनी लगावलेल्या टोल्याला गिरीश महाजन यांनी मिश्किल प्रतिक्रियेने उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहिल्यानगर दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी अमित शाह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत काही तोडगा निघाला का? यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांना विचारण्यात आला होता. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल, असे मिश्किल वक्तव्य दादा भुसे यांनी केले. यावर आता गिरीश महाजन यांनी टोलेबाजी केली.
दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील
भुसे यांच्या म्हणण्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे घनिष्ठ संबंध कदाचित असतील. त्यामुळे ते ट्रम्प यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडविण्याची विनंती करतील. किंवा फोन करून सांगतील की, काही तरी करा म्हणून. माझे तसे कोणतेच संबंध अमेरिकेशी नाहीत किंवा मी तिकडे गेलोही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी नाशिकचे पालकमंत्रीपद तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी चर्चा झालेली नाही, असे मिश्किल उत्तर महाजन यांनी दिले.
दरम्यान, कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाला महत्व प्राप्त झाले आहे. महायुतीतील तीनही पक्षांनी पालकमंत्रीपदाचा विषय प्रतिष्ठेचा केला. भाजपाकडून गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मंत्री माणिक कोकाटे, तर शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री दादा भुसे ही मंडळी इच्छुक आहेत.