जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
By यदू जोशी | Updated: April 28, 2026 09:06 IST2026-04-28T09:05:13+5:302026-04-28T09:06:01+5:30
महाराष्ट्रातील जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीच्या टप्प्याने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, १४१ मुख्य प्रशिक्षक आणि ३,८५० क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
यदु जोशी
मुंबई : जनगणनेदरम्यान नागरिकांनी दिलेली वैयक्तिक माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाते. ही माहिती कोणत्याही न्यायालयात पुराव्यासाठी वापरता येत नाही आणि ती प्राप्तिकर, पोलिस विभागासह कोणत्याही विभागाला शेअर केली जात नाही, असे महाराष्ट्राच्या जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा डांगे (आयएएस) यांनी स्पष्ट केले. जनगणनेविषयीच्या शंकांना उत्तरे देतानाच त्यांनी जनगणनेचे टप्पे कसे असतील, याविषयी ‘लोकमत’शी सविस्तर चर्चादेखील केली.
जनगणनेतील वैयक्तिक माहितीची गोपनीयता बाळगली जाते का?
डॉ. डांगे - अर्थात! पूर्ण गोपनीयता बाळगली जाते. जनगणनेचा उद्देश हा करवसुली किंवा तपासणी नसून केवळ नियोजनासाठी सांख्यिकीय डेटा गोळा करणे हा आहे.
जनगणनेत एखाद्या व्यक्तीने चुकीची माहिती दिली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात?
डॉ. डांगे - जनगणना कायदा, १९४८च्या कलम ११ (१) (ड) अंतर्गत, जनगणना प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देणे किंवा खोटी माहिती देणे हा गुन्हा आहे. या कलमानुसार दोषी व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये तीन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे.
देशाच्या धोरण आखणीसाठी जनगणना कशी महत्त्वाची आहे?
डॉ. डांगे - कल्याणकारी योजनांचे नियोजन, संसाधनांचे न्याय्य वाटप, मतदारसंघांची पुनर्रचना, आपत्ती व्यवस्थापन, स्थलांतर आणि शहरीकरण नियोजन या दृष्टीने जनगणनेचे मोठे महत्त्व आहे. लोकसंख्येचे अचूक आकडे मिळतात, सामाजिक-आर्थिक स्थिती कळते, त्यामुळे सरकारला योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येते. पायाभूत सुविधांची उभारणी कुठे आवश्यक आहे ते स्पष्ट होते. शिक्षण, आरोग्य, रोजगाराचे अचूक नियोजन
करता येते.
महाराष्ट्रात प्रत्यक्ष जनगणना कधी सुरू होईल, त्याचे टप्पे कसे असतील?
डॉ. डांगे - जनगणनेचे दोन टप्पे असतील. त्यात आधी असेल ती -स्व-गणना (सेल्फ इन्युमरेशन), त्यात नागरिक स्वतःची माहिती ऑनलाइन भरू शकतात, यासाठी १ मे ते १५ मे २०२६ पर्यंत पोर्टल खुले राहील. असा पर्याय पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आला आहे.
घरयादी व घरगणना कार्य : प्रगणक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करतील.
दुसरा टप्पा - लोकसंख्या गणना : प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणार आहे.
महाराष्ट्रातील जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीच्या टप्प्याने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, १४१ मुख्य प्रशिक्षक आणि ३,८५० क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. डेटा संकलनामध्ये एकसमानता आणि अचूकता राखण्यासाठी, २३ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत सुमारे २.३ लाख प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी सखोल प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. यासोबतच, जिल्हा आणि महापालिका स्तरावर ‘हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स’ म्हणजेच घरयादी गट निश्चित करण्याचे आणि त्यानंतर कर्मचारी वाटपासाठी पर्यवेक्षकीय मंडळे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या तांत्रिक तयारीला पूरक म्हणून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि ‘स्व-प्रगणने’च्या प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्यभर व्यापक प्रसिद्धी मोहीम राबवली जात आहे.
शेवटच्या माणसाची गणना
दुर्गम, अतिदुर्गम भागात वाड्यावस्त्यांवर राहणार्या व्यक्तींचीही गणना झालीच पाहिजे हे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी आमची यंत्रणा सज्ज असेल. जनगणनेची जबाबदारी असलेले कर्मचारी/शिक्षक हे झोकून देऊन काम करतील असा आमचा ठाम विश्वास आहे.