Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 09:00 IST2025-09-08T08:59:00+5:302025-09-08T09:00:42+5:30
गणपती विसर्जनाशी संबंधित विविध घटनांमध्ये किमान नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर, १२ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
गणपती विसर्जनाशी संबंधित विविध घटनांमध्ये किमान नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर, १२ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटना ठाणे, पुणे, नांदेड, नाशिक, जळगाव, वाशिम, पालघर आणि अमरावती जिल्ह्यांत नोंदवण्यात आल्या, अशी माहिती पीटीआयने दिली.
पुणे जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जण बुडाल्याची माहिती आहे. वाकी खुर्द येथे भामा नदीत दोन जण आणि शेल पिंपळगाव येथे एक जण वाहून गेले. तर, बिरवाडी येथे आणखी एक व्यक्ती विहिरीत पडली आणि खेड येथे ४५ वर्षीय एक पुरूष वाहून गेला. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, अशी माहिती पुण्यातील एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील गंडेगाव येथे नदीत तीन जण वाहून गेले, असे एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले. एकाला वाचवण्यात आले, तर इतर दोघांसाठी शोध मोहीम सुरू आहे, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि कळवण येथेही अशाच प्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत, जिथे पाच जण वाहून गेले. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ठाण्यातील शहापूर तालुक्यातील मुंडेवाडी येथील तीन जण धरणाजवळील भार्गवी नदीच्या प्रवाहात वाहून गेले. गणेशमूर्ती विसर्जित करून परतत असताना ते पाण्यात बुडाले, अशी माहिती शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुले यांनी दिली. दत्ता लोटे, प्रतिप मुंडे आणि कुलदीप जकारे अशी त्यांची नावे आहेत. पालघर जिल्ह्यात गणपती मूर्ती विसर्जनादरम्यान ओढ्यात वाहून गेलेल्या तीन जणांना रो-रो बोटीच्या मदतीने वाचवण्यात आले, अशीही माहिती आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ११ दिवसांच्या गणेशोत्सवात १,९७,११४ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले, ज्यात १ लाख ८१ हजार ३७५ घरगुती मूर्ती आणि १० हजार १४८ सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती आणि ५ हजार ५९१ गौरी आणि हरतालिकेच्या मूर्तींचा समावेश होता. यातील ६० हजार ४३४ मूर्तींचे विसर्जन दीड दिवसानंतर करण्यात आले. गणेश उत्सवाच्या पाचव्या दिवशी ४० हजार २३०, सातव्या दिवशी ५९ हजार ७०४ आणि शेवटच्या दिवशी ३६ हजार ७४६ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.