धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:36 IST2025-10-24T16:27:25+5:302025-10-24T16:36:48+5:30
साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीएसआय गोपाल बदनेचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे.

धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
PSI Gopal Badnae: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांचे नाव समोर आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ज्या अधिकाऱ्यावर आता बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत, त्याच बदने यांनी काही महिन्यांपूर्वी जीवावर उदार होऊन मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली होती. मात्र आता महिला डॉक्टरवर बलात्कार आणि आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचं तरुणीने लिहिलं आहे. मयत तरुणी मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी होती. पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार असं महिलेने हातावर लिहीलं होतं. ती फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर गोपाळ बदनेने काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईची चर्चा सुरु झाली आहे. बदने सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काही महिन्यांपूर्वी फलटण परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला पकडताना पी.एस.आय. गोपाल बदने यांनी अत्यंत शौर्य दाखवले होते. गांजा तस्करांना पकडण्याच्या या कारवाईदरम्यान, आरोपींनी बदने यांना गाडीसोबत फरफटत नेले होते. या पाठलागात बदने यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या धडाकेबाज कारवाईमुळे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्याकडून त्यांचे कौतुक झाले होते.
एप्रिल महिन्यात फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे पोलिसांचा तपासणी नाका केला होता. त्यावेळी सात सर्कल रोडवरील एका शेतात एक पांढर्या रंगाची कार आली. तिला बदने यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती धडकून थांबली. चालकाकडे चौकशी करत असतानाच चालकाने अचानक खिडकीची काच वर घेतली. यात बदने यांचा हात अडकला. आरोपीने तशीच कार पळवत नेली. सुमारे एक किलोमीटरपर्यंत बदने यांना फरफटत नेले. त्यानंतर कार शेतात जाऊन उभी राहिली आणि कारचालक पळून गेला. मात्र शेजारच्या व्यक्तीला पळून जाता आले नाही. वेळी कारमध्ये पांढऱ्या गोणीत दहा किलो ३० ग्रॅम गांजा आढळून आला. बदने यांच्यावर फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते.
अशी कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर एका महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी बलात्कार आणि छळाचा गंभीर आरोप केल्याने संपूर्ण पोलीस दल चक्रावले आहे. महिला डॉक्टरने आपल्या हातावर स्पष्टपणे लिहिले की, "PSI गोपाल बदनेने माझा चारवेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक त्रास दिला." यासोबतच पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बदने यांना तातडीने निलंबित केले असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.