स्वातंत्र्यसैनिक प्राणजीवन जानी यांचे निधन, यवतमाळवर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 21:38 IST2019-12-17T21:28:50+5:302019-12-17T21:38:22+5:30
ब्रिटिश सरकारला ‘भारत छोडो’ असे निक्षूण सांगत चळवळीची मशाल पेटविणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्राणजीवन जानी यांची प्राणज्योत मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता मालवली.

स्वातंत्र्यसैनिक प्राणजीवन जानी यांचे निधन, यवतमाळवर शोककळा
यवतमाळ - ब्रिटिश सरकारला ‘भारत छोडो’ असे निक्षूण सांगत चळवळीची मशाल पेटविणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्राणजीवन जानी यांची प्राणज्योत मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता मालवली. मृत्यूसमयी ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
प्राणजीवन दयालजी जानी हे १९४२ च्या इंग्रजांविरुद्धच्या ‘चले जाव’ चळवळीतील क्रांतीकारक होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आवाहन करताच संपूर्ण भारतातील तरुणांनी या स्वातंत्र्य समरात आपापल्या परीने उडी घेतली. यवतमाळ जिल्हाही त्याला अपवाद नव्हता. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या नेतृत्वात तेव्हा यवतमाळात प्रभातफेरी काढणे, पत्रके छापून वाटणे, सभा घेणे सुरू झाले. त्यावेळी बाबूजींसोबत ज्या १२ स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना ब्रिटिशांनी अटक करून जबलपूरच्या तुरुंगात डांबले, त्यांच्यापैकी एक महत्त्वाचे स्वातंत्र्य सैनिक होते प्राणजीवन जानी.
जीवनात अनेक चढउतार पाहणारे प्राणजीवन जानी हे उतारवयातही समाजातील प्रत्येक घडामोडींकडे नजर ठेवून होते. वाचनाचा व्यासंग त्यांनी शेवटपर्यंत जपला. मात्र दोन महिन्यांपूर्वी ते घरातच पडले आणि तेव्हापासून ते अंथरूणाला खिळले होते. तरीही भेटायला येणाऱ्या प्रत्येकासोबत ते कधी बोलून तर कधी स्पर्शाने व्यक्त होत होते. लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्यासोबत ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी आता कोणीही हयात नाहीत. त्यातील शेवटची क्रांतीकारी मशाल असलेले प्राणजीवन जानी यांनीही मंगळवारी शेवटचा श्वास घेतल्याने यवतमाळवासीयांवर शोककळा पसरली आहे.
देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या या स्वातंत्र्यसैनिकाने सर्वत्र चाहते मिळविले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा अॅड. प्रवीण जानी, स्नुषा भारती जानी, नातू अमित जानी, नात मोनिका जानी, नात सून हिमाली अमित जानी, पणतू सार्थक, जैनिल असा आप्त परिवार आहे. बुधवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता धामणगाव रोडवरील नेहरूनगर स्थित त्यांच्या ‘कृष्णविहार’ या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार आहे. तर पांढरकवडा रोडवरील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
राष्ट्रपती भवनात सन्मान
९ आॅगस्ट २०१३ रोजी देशभरातील स्वातंत्र्य सैनिकांना क्रांतिदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी यवतमाळचे स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्राणजीवन जानी यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन्मानित केले होते.
प्राणजीवन जानी यांचा जीवनपरिचय
प्राणजीवन दयालजी जानी यांचा जन्म १२ जून १९२२ रोजी सिहोर (गुजरात) येथे झाला. सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी यवतमाळ हे कापसाचे मोठे व्यापारी केंद्र होते. मात्र शेतकºयांसाठी जेवणाची कोणतीही सोय नव्हती. हे लक्षात घेऊन त्यांच्या मामांनी १४ वर्षांच्या प्राणजीवनला यवतमाळात आणले. सावकारपेठेत बॉम्बेवाला हॉटेल काढून गरिबांच्या जेवणाची सोय केली. हॉटेल सांभाळून त्यांनी हिंदी हायस्कूलमध्ये शिक्षणही सुरू ठेवले. १९३८ पासून ते राजकारणात सक्रीय झाले. १९३९ साली त्यांनी मित्रांसमवेत महात्मा गांधींची भेट घेतली. ‘खादी का वापरत नाही?’ असा प्रश्न जेव्हा गांधीजींनी त्यांना केला, तेव्हा त्यांनीही ‘उद्यापासून खादी वापरेन’ असा शब्द दिला आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत पाळला. याच काळात बाबूजींनी यंग असोसिएशनची (आझाद युवक संघ) स्थापना केली. या संघाद्वारे आणि गुजराती नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम सुरू झाले. बाबूजींसमवेत जेव्हा प्राणजीवन जानी यांना अटक झाली, तेव्हा ते मॅट्रिकच्या वर्गात शिकत होते. ११ आॅगस्ट १९४२ ते १६ नोव्हेंबर १९४२ असे दोन महिने ६ दिवस ते जबलपूरच्या तुरुंगात होते. पहिल्या दिवशी जेलर आले तेव्हा त्यांना उभे राहण्यास सांगण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी उभे राहण्यास नकार दिला. ते तुमचे साहेब असतील आमचे नाही. आम्ही त्यांचे नोकर नाही आणि कोणता गुन्हाही केला नाही, असे या सर्वांनी स्पष्ट सांगितले. तुरुंगातून सुटल्यावर मामांचे हॉटेल सांभाळून हॉकी, व्हॉलिबॉल या खेळातही सहभागी होऊन जिल्हास्तरीय स्पर्धा त्यांनी गाजविल्या. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणूनही कार्य केले. हॉटेल असोसिएशन आणि गुजराथी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. भूदान चळवळीला यवतमाळातून मिळालेल्या प्रतिसादानंतर पंडित जवाहरलाल नेहरु यांचा कार्यक्रम १८ एप्रिल १९५९ रोजी यवतमाळात झाला. त्यात प्राणजीवन जानी हे स्वयंसेवकाच्या भूमिकेत होते. नेहरुंना पाणी हवे होते. हे कळताच प्राणजीवन जानी यांनी थेट घर गाठले आणि चक्क पाण्याचे मडकेच घेऊन गेले. अशा या निस्पृह आणि निस्वार्थ स्वातंत्र्य संग्राम सैनिकाने मंगळवारी जगाचा निरोप घेतला.