सैन्यात भरतीच्या नावावर फसवणूक, यूपीत तिघांना अटक; मिलिटरी इंटेलिजन्सने केला टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 12:58 PM2021-09-19T12:58:55+5:302021-09-19T12:59:39+5:30

‘लाेकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शुभम शर्मा, राहुल शर्मा व महेंद्र पाल यांचा समावेश असून, ते उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील बसई गावचे आहेत.

Fraud in the name of army recruitment, three arrested in UP; Military intelligence exposes gang | सैन्यात भरतीच्या नावावर फसवणूक, यूपीत तिघांना अटक; मिलिटरी इंटेलिजन्सने केला टोळीचा पर्दाफाश

सैन्यात भरतीच्या नावावर फसवणूक, यूपीत तिघांना अटक; मिलिटरी इंटेलिजन्सने केला टोळीचा पर्दाफाश

Next

आशिष दुबे -

नागपूर : लष्करात भरतीच्या नावावर युवकांची फसवणूक करणाऱ्या टाेळीचा मिलिटरी इंटेलिजन्सने पर्दाफाश केला आहे. इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील पाेलिसांनी टाेळीच्या सूत्रधारासह इतर दाेन आराेपींना अटक केली आहे. ही टाेळी काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये झालेल्या सैन्य भरतीदरम्यान सक्रिय हाेती. 

‘लाेकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शुभम शर्मा, राहुल शर्मा व महेंद्र पाल यांचा समावेश असून, ते उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील बसई गावचे आहेत. कामठी येथे ५ सप्टेंबर २०२१ ला सेनेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. देशभरातून तरुण या भरतीसाठी पाेहोचले हाेते. टाेळीचा सूत्रधार शुभम शर्मा त्याच्या भावाला घेऊन कामठीला आला. त्याची भेट उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील लवलेश कुमार यादव या तरुणाशी झाली. शुभमने त्याचा माेबाईल क्रमांक मिळवला. शुभमने नंतर लवलेशचा माेबाईल नंबर त्याचा चुलत भाऊ आराेपी राहुल शर्माला दिला. पुढे शुभमने लवलेशशी संपर्क करून स्वत:ची लष्करात उच्च अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगत त्याला नाेकरीचे आमिष दाखवून २० हजार रुपयाची मागणी केली. भरती झाल्यानंतर उर्वरित ८० हजार देण्यास सांगितले. लवलेश तयार झाला. शुभमने दिलेल्या माेबाईल क्रमांकावर संपर्क केल्यानंतर आराेपी राहुलने काॅल घेत स्वत: लष्करी अधिकारी असल्याचे सांगत, नोकरीचा विश्वास दिला. साेबतच बँक खात्याचा क्रमांक देऊन २० हजार जमा करण्यास सांगितले. हे खाते आराेपी महेंद्र पालचे हाेते. 

असे आले उजेडात प्रकरण 
तरुणांना ठकबाजांपासून वाचविण्यासाठी मिलिटरी इंटेलिजन्सही सक्रिय हाेते. त्यांनी संशयितांवर नजर ठेवली. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्याची एक टाेळी सेनेत भरतीच्या नावावर तरुणांची फसवणूक करीत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. प्रकरणाचा तपास करीत १६ सप्टेंबरला इंटेलिजन्सने बरेलीच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. बरेली गुप्तचर विभागाने स्थानिक पाेलिसांना माहिती देत एफआयआर दाखल केला. १७ सप्टेंबरला तिन्ही आराेपींना अटक करण्यात आली.
 

Web Title: Fraud in the name of army recruitment, three arrested in UP; Military intelligence exposes gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app