हरवलेला मोबाईल अर्ध्या तासात मिळाला

By admin | Published: June 8, 2017 06:22 AM2017-06-08T06:22:56+5:302017-06-08T06:22:56+5:30

कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्यासह ठाणेनगर आणि चितळसर पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला.

Found lost mobile in half an hour | हरवलेला मोबाईल अर्ध्या तासात मिळाला

हरवलेला मोबाईल अर्ध्या तासात मिळाला

Next

जितेंद्र कालेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पाचपाखाडीतून एका व्यापाऱ्याचा मोबाइल हिसकावून दोन चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकल्याची माहिती मिळताच कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्यासह ठाणेनगर आणि चितळसर पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला. अखेर, खारेगाव टोलनाक्याजवळ इराणी टोळीतील आपेदारा जाफर हुसेन (२१, रा. अंबिवली) याला धुमाळ यांच्या पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. मोटारसायकल आणि चोरलेला एक मोबाइलही त्याच्याकडून जप्त केला आहे. त्याचा दुसरा साथीदार पसार झाला.
पाचपाखाडीतील रणजित ठाकरे त्यांचे दुकान बंद करून बुधवारी रात्री घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून धूम ठोकली. काही अंतरावर जाऊन त्यांनी आणखी एकाचा मोबाइल हिसकावला. ठाकरे यांनी ही माहिती ठाणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला त्यांनी फोनद्वारे दिली. नियंत्रण कक्षाने तत्काळ ती बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे पोलिसांच्या चॅनलवर दिली. ‘दोघे संशयित मोबाइल हिसकावून दुचाकीवरून कळवा भागाकडे पळाले आहेत, अशी माहिती रात्रीच्या गस्तीवरील कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी ऐकली. त्या वेळी ते कळवा पोलीस ठाण्यात भेट देऊन बाहेर पडले होते. राबोडीकडे त्यांची गाडी जात असताना त्यांनी दोघा संशयितांची चौकशीही केली. त्यांच्याकडे काहीच मिळाले नाही. त्यानंतर, हे चोरटे साकेत ब्रिजकडे येत असल्याचा पुन्हा दुसरा कॉल नियंत्रण कक्षाने दिला. साकेतकडे चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, ठाणेनगरच्या सहायक पोलीस निरीक्षक सुषमा वायदंडे यांचे पथकही या चोरट्यांच्या मागावर होते. या तिन्ही पथकांना हुलकावणी देऊन दुचाकीस्वार तिथून निसटले. ते राष्ट्रीय महामार्गावरून नाशिकच्या दिशेने जात असल्याची माहिती पिंगळे यांच्याकडून धुमाळ यांना मिळाली. याच माहितीमुळे ते खारेगाव टोलनाक्याजवळ मधोमध जीप लावून उभे राहिले. त्या वेळी ताशी १०० किमीच्या वेगाने आलेल्या या चोरट्यांनी तिथूनही निसटण्याचा प्रयत्न केला. धुमाळ यांनी काठी भिरकावल्याने त्यांची दुचाकी घसरली. तशाही अवस्थेत उठून त्यांनी दलदलीतून पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, धुमाळ यांच्या गाडीवरील चालक एन.जी. राख आणि पोलीस शिपाई व्ही.एस. गाडे यांनी त्यांच्यापैकी आपेदारा याला पकडले. त्याचा साथीदार मात्र जवळच्या झुडुपातून पसार झाला. धुमाळ यांनी दलदलीत उतरून दुसऱ्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाती लागला नाही. मोबाइल अवघ्या अर्ध्या तासांमध्येच पोलिसांनी मिळवून दिला.

Web Title: Found lost mobile in half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.