"गेल्या १० वर्षात मी अज्ञातवासात..."; पक्ष सोडताच सूर्यकांता पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 03:44 PM2024-06-25T15:44:19+5:302024-06-25T15:46:34+5:30

राष्ट्रवादीत मी निवडणूक लढवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आले असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

Former Union Minister Suryakanta Patil joined Sharad Pawar's NCP criticized BJP | "गेल्या १० वर्षात मी अज्ञातवासात..."; पक्ष सोडताच सूर्यकांता पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

"गेल्या १० वर्षात मी अज्ञातवासात..."; पक्ष सोडताच सूर्यकांता पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

मुंबई - गेली १० वर्ष मी स्वत: अज्ञातवासात होते. मोठ्या उत्साहाने भाजपात गेली होती. भाजपा शिस्तीचा आणि न्यायप्रिय पक्ष असल्याचं वाटत होतं. कारण मी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांना ओळखत होते. परंतु आता जो पक्ष आहे तो भाजपा नाही. हा वेगळाच आहे. सध्याचा भाजपा व्यापारी, धनाढ्य लोकांचा आणि स्त्रियांना अजिबात महत्त्व न देणारा पक्ष आहे असा गंभीर आरोप माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केला. नुकत्याच सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला रामराम केला. त्यानंतर आज शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.

यावेळी सूर्यकांता पाटील म्हणाल्या की, महिलांना मान देण्याचा कार्यक्रम आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात केला. महिलांना न्याय देणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीत काम केले. परंतु आपण आपल्या संस्कारापासून फार दूर आलो असं वाटलं. मी निवडणूक लढवली नाही, काही कमिटी मागितली नाही. काहीही न मागता भाजपात गेली. परंतु गेली १० वर्ष मी आत्मशोधात गेली. आपण जिथे आलो तिथेच गेले पाहिजे असं लक्षात आले. तेव्हा साहेबांशी बोलले, त्यांनी होकार देताच मी क्षणाचा विलंब न लावता पुन्हा स्वगृही परतले असं त्यांनी म्हटलं.

तसेच मी खदखद पक्षाकडे मांडली नाही. मला भाजपाने लोकसभा कबुल केली होती. हिंगोली, नांदेड या मतदारसंघात मी लाखोने निवडून आले होते. परंतु २०१४ आणि २०१९ मला एकही मतदारसंघ दिला नाही. मग कशासाठी थांबायचे, राष्ट्रवादीत मी निवडणूक लढवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आले. मी ज्या संस्कारात वाढले ते मला तिथे दिसले नाही. लोककल्याणापेक्षा स्वकल्याण करण्यात भाजपा नेतृत्व हरवले आहे. मला स्वकल्याणात रस नाही. ४५ वर्षाच्या राजकारणात मी ते केले नाही असंही सूर्यकांता पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मी कुठलाही विचार न करता पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहे. ज्यांना स्वगृही परतायचे आहे त्यांना घ्यायला मी तयार असल्याचं साहेबांनी सांगितले. ज्यांनी लाथाच मारायच्या ठरवल्या त्यांचा विचार साहेब करणार नाही. आम्ही इतर पक्षात गेलो परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी, शरद पवारांबाबत गेल्या १० वर्षात मी एक शब्दही बोलले नाही. हेच भाजपाचे दु:ख होते. शरद पवारांचे घर फोडण्याचा भाजपाचा जो कार्यक्रम होता तो आता संपला आहे. मी अटीशर्थी घालून काम करण्याचं नाटक केले नाही असंही सूर्यकांता पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Former Union Minister Suryakanta Patil joined Sharad Pawar's NCP criticized BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.