"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 20:16 IST2025-07-22T20:15:44+5:302025-07-22T20:16:09+5:30

Kalyan News: कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीयाने मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर आरोपी गोपाल झा हा फरार झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

"Find the accused within four hours, otherwise..." MNS aggressive over the assault on a Marathi girl in Kalyan | "त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 

"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 

कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीयाने मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर आरोपी गोपाल झा हा फरार झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली असून, आरोपीला चार तासात शोधून काढा, नाहीतर मनसे स्टाईलमध्ये आंदोलन केलं जाईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

याबाबत इशारा देताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, सदर मुलगी मारहाण झाल्याने घाबरली आहे. ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुस्थितीत नाही आहे. या घटनेमधील व्यक्ती स्थानिक असो, परप्रांतीय असो वा कुणी असो, त्याने त्या मुलीसोबत ज्या प्रकारचं कृत्य केलं ते निंदनीय आहे. या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्याआधी जनता म्हणून प्रसाद दिला पाहिजे, असे मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच जर या आरोपीला चार तासांत अटक केली नाही. तर आम्ही त्याला आमच्या पद्धतीने अटक करू. चोप देऊ आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या घटनेतील पीडित मुलीची प्रतिक्रियाही पुढे आली आहे. तिने सांगितले की, "मी बाल चिकित्सालय क्लिनिक मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. हा इसम अनन्या झा नावाच्या रुग्णाबरोबर आला होता. मी पहिल्यांदाच त्याला इथे पाहिले. तो आतमध्ये जाण्यासाठी खूप घाई करत होता. मी त्याला एवढंच बोलले की, तुमचा सध्या नंबर नाहीये, तुम्ही १० मिनिटे वाट बघा. तर त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने शिवीगाळ केल्यानंतर मी ही व्यक्ती माझ्याशी योग्य पद्धतीने बोलत नाही आहे, असे आमच्या सरांना सांगितले.. मी त्याला असेही सांगितले की तू माझ्याशी नीट बोल. तर तो माणूस माझ्या अंगावर मारण्यासाठी धावला आणि त्यानंतर माझे केस पकडून दरवाजापर्यंत मला खेचत खेचत नेले. मला त्यांनी एवढे मारलं की माझा श्वासही थोड्या क्षणांसाठी थांबला होता, असे पीडित तरुणीने सांगितले.

या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गोपाळ झा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Web Title: "Find the accused within four hours, otherwise..." MNS aggressive over the assault on a Marathi girl in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.