रूपाली चाकणकर यांच्यावर आर्थिक आरोप, तृप्ती देसाईंसह पिडितेवर सांगलीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:04 IST2025-07-04T12:04:08+5:302025-07-04T12:04:40+5:30
महिला आयोग, पोलिस प्रशासन आणि सत्ताधारी संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला

रूपाली चाकणकर यांच्यावर आर्थिक आरोप, तृप्ती देसाईंसह पिडितेवर सांगलीत गुन्हा दाखल
सांगली : कडेगाव येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने केलेल्या बलात्कार प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर आर्थिक आरोप केल्याबद्दल भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई व पिडित तरूणीवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बनाडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत पीडितेने दि. २८ मे रोजी सांगलीत पत्रकार परिषदेत कैफीयत मांडली होती. २०२० मध्ये कडेगावच्या तत्कालीन पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस याने स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने घरी नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. राज्यभर आंदोलन सुरू झाले. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस अधिकाऱ्याला वाचवण्याची विनंती करून पुनर्वसनाची हमी दिली.
तेव्हा दीड कोटी रूपयांची ऑफर दिल्याचा आरोप पिडितेने केला. तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी सांगलीत हॉटेलमध्ये पिडितेला चार दिवस नजरकैदेत ठेवले. महिला आयोग, पोलिस प्रशासन आणि सत्ताधारी संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला.
दरम्यान, तृप्ती देसाई व पिडितेने सांगलीत केलेल्या आरोपांची दखल महिला आयोगाने घेतली. त्यानुसार सदस्य सचिव डॉ. बनाडे यांनी दि. ३ जुलै रोजी सांगलीत येऊन विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हंटले आहे, तृप्ती देसाई व पिडितेने सांगलीत येऊन महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी सह्याद्री अतिथी गृहावर पैशाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. संशयित दोघींनी महिला आयोग, पोलिस किंवा अन्य यंत्रणेकडे तक्रार न देता, पुरावा सादर न करता चाकणकर यांच्यावर आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन केली आहे. या फिर्यादीवरून तृप्ती देसाई व पिडित महिलेविरूद्ध बीएनएस ३५६ (२), ३ (५) नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
बीएनएस ३५६ (२), ३ (५) कलम काय आहे?
बीएनएस ३५६ (२) नुसार एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे गुन्हा आहे. खोटे आणि अपमानकारक बोलल्यामुळे प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते. प्रतिमा मलिन होऊ शकते. त्याबद्दल या कलमानुसार गुन्हा दाखल केला जातो.