महायुती सरकारच्या केवळ पवार नव्हे तर मेहता घोटाळ्या प्रकरणी देखील गुन्हे दाखल करा - महाविकास आघाडीच्या आंदोलनात मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 21:48 IST2025-11-10T21:47:26+5:302025-11-10T21:48:02+5:30
यावेळी आंदोलकांनी भाजपा, शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गट च्या महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी केली व अनेक आरोप केले.

महायुती सरकारच्या केवळ पवार नव्हे तर मेहता घोटाळ्या प्रकरणी देखील गुन्हे दाखल करा - महाविकास आघाडीच्या आंदोलनात मागणी
मिरारोड - पुणे जमीन खरेदी व मुद्रांक शुल्क बुडवले प्रकरणी केवळ पार्थ पवार घोटाळा नव्हे तर मीरा भाईंदर मधील मेहता मुद्रांक घोटाळ्याच्या पुराव्यांसह तक्रारी होऊन देखील कारवाई होत नाही, असा आरोप करत ह्या दोन्ही घोटाळ्या प्रकरणी गुन्हे दाखल करा अशी मागणी सोमवारी महाविकास आघाडी आणि मनसेच्या आंदोलन प्रसंगी करण्यात आली. भाईंदर पश्चिम कडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सोमवारी काँग्रेस, ठाकरे सेना, मनसे तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थ पवार ह्या मुलाने पुणे येथील केलेल्या कथित जमीन खरेदी घोटाळा व मुद्रांक फसवणूक बद्दल आंदोलन केले.
त्याबाबत सह दुय्यम निबंधक यांना निवेदन देऊन १८०० कोटींची जमीन मूल्य ३०० कोटी दाखवून त्याचे मुद्रांक शुल्क मात्र केवळ ५०० रुपये घेण्यात आले. तोच न्याय सर्व सामान्य नागरिकांना पण द्यावा आणि प्रत्येक मुद्रांक शुल्क हे केवळ ५०० रुपये घ्यावे अशी मागणी केली. आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, माजी नगरसेवक अनिल सावंत, राजीव मेहरा, प्रकाश नागणे, मनसे शहराध्यक्ष संदीप राणे, सचिन पोपळे, अनिल रानवडे, ठाकरे सेनेच्या शहर संघटक नीलम ढवण, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख मनोज मयेकर, धनेश पाटील, प्रकाश सावंत आदींसह तिन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलकांनी भाजपा, शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गट च्या महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी केली व अनेक आरोप केले. पार्थ पवार व संबंधित यांचा जमीन घोटाळा व मुद्रांक शुल्क घोटाळा जेवढा गंभीर आहे तेवढाच गंभीर घोटाळा मीरा-भाईंदर मध्ये भाजपा आमदार नरेंद्र मेहता व त्यांच्या कंपनीचा आहे. नोंदणीकृत नसलेल्या करारनाम्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणूक करून विकल्या व त्यावर बांधकाम केली आहे. नाममात्र मोबदला दाखवून तसेच नाममात्र मुद्रांक शुल्क भरून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे झालेले आहेत.
स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाई करण्याचे पत्र दिले. त्यावर मात्र मुद्रांक शुल्क विभाग आणि शासन गुन्हे दाखल करत नाही. उलट अभय योजनेच्या आड शासनाचा महसूल नाममात्र शुल्क आकारून संगनमताने हडप केला जात असल्याचा आरोप मनसेचे संदीप राणे, ठाकरे सेनेचे मनोज मयेकर यांनी यावेळी केला. पार्थ पवार आणि कंपनी घोटाळा सह मीरा-भाईंदरच्या नरेंद्र मेहता आणि कंपनी घोटाळ्या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून सर्व व्यवहार रद्द करावे अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.