शेतकऱ्यांना हवं जगण्याचं बळ; सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात, धक्कादायक वास्तव आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:32 IST2025-10-01T12:31:09+5:302025-10-01T12:32:08+5:30
देशभरात २०२३ मध्ये १०,७८६ आत्महत्या शेतीशी संबंधित; ३ वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ ०.३ टक्क्यांनी घट, प्रभावी उपाययाेजनांची आवश्यकता

शेतकऱ्यांना हवं जगण्याचं बळ; सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात, धक्कादायक वास्तव आले समोर
मुंबई : बेभरवशाची शेती आणि त्यातून डोईवर वाढणारे कर्ज या विळख्यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे भयावह वास्तव केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
२०२३ मध्ये देशातील सरासरी प्रत्येक २ पैकी १ शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाली आहे. देशभरात २०२३ मध्ये एकूण १०,७८६ शेतीशी संबंधित आत्महत्या झाल्या असून ४,६९० आत्महत्या शेतकरी, तर ६,०९६ आत्महत्या शेतमजुरांनी केल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ६,६६९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली असून, ४,१५० शेतकरी आणि २,५१९ शेतमजूर यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
देशात २०२३ मध्ये एकूण १,७१,४१८ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण ६.३ टक्के आहे. या ४,६९० शेतकरी/शेतमजुरांच्या आत्महत्यांपैकी ४,५५३ पुरुष आणि १३७ महिला आहेत. २०२१ मध्ये १०,८८१, तर २०२२ मध्ये ११,२९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०२१ मध्ये एकूण आत्महत्यांच्या तुलनेत हे प्रमाण ६.६ टक्के, तर २०२२ मध्येही ६.६ टक्के इतकेच राहिले आहे. याचाच अर्थ गेल्या ३ वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ ०.३ टक्क्यांनी घट झाली आहे.
महिला शेतकऱ्यांनीही संपविले जीवन
भारतात शेतकरी आत्महत्यांत ९७% पुरुष, ३% महिला आहेत. महाराष्ट्रातही हेच प्रमाण दिसते. अहवालानुसार, महाराष्ट्रात २०२३ मध्ये ३,९०१ पुरुष तर २५० महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २,४४१ पुरुष आणि ७७ महिला शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये महिलांचे प्रमाण ५ टक्क्यांच्या आसपास आहे.
देशात सर्वाधिक आत्महत्या कुणाच्या?
रोजंदारी कामगार २७.५%
गृहिणी १४.०%
स्वयंरोजगार ११.८%
पगारी कर्मचारी ९.६%
बेरोजगार ८.३%
विद्यार्थी ८.१%
शेती क्षेत्र ६.३%
निवृत्त व्यक्ती ०.६%
इतर १३.७%
कोणत्या राज्यांत शेतकरी आत्महत्या नाहीत? : पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप.
देशभरात आत्महत्या का केल्या जात आहेत?
कौटुंबिक समस्या ३१.९%
आजारपण १९.०%
व्यसन/दारूचे व्यसन ७.०%
विवाहाशी संबंधित समस्या ५.३%
प्रेमसंबंध ४.७%
दिवाळखोरी/कर्जबाजारीपणा ३.८%
बेरोजगारी १.८%
परीक्षेत अपयश १.४%
नातेवाइकांचा मृत्यू १.३%
व्यावसायिक/करिअर समस्या १.१%
मालमत्तेचा वाद १.०%
गरिबी ०.७%
सामाजिक प्रतिष्ठा गमावणे ०.५%
अवैध संबंध ०.४%
वंध्यत्व/अपत्य न होणे ०.३%
कारण माहीत नाही १०.०%
इतर कारणे ९.८%
व्यावसायिकांच्या आत्महत्या सर्वाधिक कुठे?
महाराष्ट्र १६%
कर्नाटक १४.१%
तामिळनाडू ८.९%
प. बंगाल ८%
मध्य प्रदेश ६.८%