शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 11:33 IST2025-09-29T11:10:19+5:302025-09-29T11:33:33+5:30
तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन त्वरीत बोलवावे असं त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे.

शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
मुंबई - संपूर्ण मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे. याठिकाणी अनेक नद्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पिकांसह शेतीतील मातीही वाहून गेली. घरे बुडाली, संसार उद्ध्वस्त झाला. जनावरे दगावली. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या पॅकेजची गरज आहे. त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपालांना पत्र लिहून मागणी केली आहे.
विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की, अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक संकटात सापडला आहे. त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. तब्बल ४ लाख हेक्टरहून अधिक पिके नष्ट झाली आहेत. जनावरे वाहून गेली, घरे कोसळली, काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. रस्ते खचले, दळणवळणाची सेवा खंडित झाली आहे. पिण्याचे पाणी दूषित झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या गंभीर संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने ठोस धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन त्वरीत बोलवावे असं त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे.
तर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा यासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा करावी. राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकरी, जनावरे, घरे, जनजीवन सर्व उद्ध्वस्त झाले आहे. परंतु, सरकारकडून आवश्यक मदत होताना दिसत नाही. शेतकरी व नागरिकांचे प्रश्न ऐकले जावेत, नुकसान भरपाई व मदत पॅकेजवर सखोल चर्चा व्हावी, भरीव मदतीचा निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राज्यपालांना केल्याचं माजी मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा यासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा करावी!
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 28, 2025
राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकरी, जनावरे, घरे, जनजीवन सर्व उद्ध्वस्त झाले आहे. परंतु, सरकारकडून आवश्यक मदत होताना दिसत नाही.
शेतकरी व नागरिकांचे प्रश्न ऐकले जावेत, नुकसान भरपाई व… pic.twitter.com/0PAA8nUHK8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस
दरम्यान, दरवर्षी पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात यंदा मात्र गेल्या पंधरा दिवसांत सरासरीपेक्षा ६०% जास्त पाऊस झाल्याने पूरस्थिती ओढावली. त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रातही पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे मराठावाडा जलमय झाला असून दोन आठवड्यांत मराठवड्याचे चित्रच बदलले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. मराठवाड्यासह, नाशिक, जळगाव, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे.