'त्या' शेतकरी, शेतमजुरांना १० लाखांची मदत द्या; काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:59 IST2025-07-02T12:57:57+5:302025-07-02T12:59:55+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: महाराष्ट्रात वीज पडून २०२२ मध्ये २३६ तर २०२३ मध्ये १८१ मृत्यू

'त्या' शेतकरी, शेतमजुरांना १० लाखांची मदत द्या; काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी
Vijay Vadettiwar, Maharashtra Assembly Monsoon Session 2025: राज्यात सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले होते. या गोंधळात काँग्रेसचे नाना पटोले यांचे एका दिवसासाठी निलंबनदेखील करण्यात आले होते. त्यानंतर आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले. राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते आहे. पण ही मदत वाढवून १० लाखांची करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.
विरोधकांची मागणी
विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा शेतमजुरांच्या मृत्यू प्रकरणी १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली. वाघाने हल्ला केल्यावर २५ लाख रुपयांची मदत केली जाते. वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे मात्र चार लाख मदत केली जाते. ही मदत पुरेशी नसल्याने या मदतीची रक्कम वाढवावी. महाराष्ट्रात वीज पडून वर्ष २०२२ मध्ये २३६ मृत्यू झाले आहेत तर वर्ष २०२३ मध्ये १८१ इतकी मनुष्यहानी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वीज पडून मृत्यू झालेले शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबाला १० लाख इतकी मदत द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
मंत्र्यांनी दिले उत्तर
यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापनामध्ये आधी वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता. पण आता त्याचा समावेश करण्यात आला आहे असे सांगितले. तसेच या प्रकरणी मदत निधी वाढवून देण्याबाबत आपल्या सूचनांचा विचार करू आणि याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.