जालना - जालना-नांदेड प्रस्तावित समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी संपादित जमिनीला रास्त मावेजा मिळावा, या मागणीसाठी कोरड्या विहिरीत उतरून, झाडावर चढून आंदोलन केले. हे आंदोलन सोमवारी देवमूर्ती (ता. जालना) शिवारात करण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते.
प्रस्तावित जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी गत ६६ दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलन करीत आहेत. प्रशासनाने ६७ शेतकऱ्यांची कामे मार्गी लागल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात २५-३० शेतकऱ्यांचीच कामे प्रस्तावित असून, अद्याप मूल्यांकन झालेले नाही. त्यातच अधिवेशन सुरू होऊन एक आठवडा उलटला तरी या प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी देवमूर्ती शिवारातील ६० फूट खोल कोरड्या विहिरीत उतरून आंदोलन केले.
‘मागण्या पूर्ण होईपर्यंत बाधित जमिनीवर एक इंचही काम करू देणार नाही’शेतकऱ्यांच्या मागण्यांचा मुद्दा सभागृहात मांडून चर्चा घडवून आणली जाईल. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बाधित जमिनीवर एक इंचही काम करू देणार नाही, असे आश्वासन आ. अर्जुन खोतकर यांनी आंदोलकांशी बोलताना दिले