मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत करा; मच्छिमारांनी केली मंत्री नितेश राणे यांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:35 IST2025-07-24T18:34:36+5:302025-07-24T18:35:37+5:30

गुजरात आणि महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांनी घेतली राणे यांची भेट

Extend fishing ban till August 15 Fishermen request Minister Nitesh Rane | मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत करा; मच्छिमारांनी केली मंत्री नितेश राणे यांना विनंती

मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत करा; मच्छिमारांनी केली मंत्री नितेश राणे यांना विनंती

मुंबई: राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशन मधील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात भेट घेऊन पावसाळी मासेमारी बंदी कालावधी गुजरात राज्याच्या धर्तीवर १५ ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी केली. फेडरेशनचे कार्यवाह सदस्य विनोद पाटील यांनी ही माहिती दिली. मंत्री नितेश राणे यांनी राज्यात पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्ट पर्यंत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे आश्वासन मच्छिमार शिष्टमंडळाला दिले.

गुजरात राज्याने पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १ जून ते १५ ऑगस्ट केल्याने शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्याने मासळी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्ट पर्यंत करण्याची जोर सर्व पारंपारिक मच्छीमारांकडून धरू लागली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहतात. त्यामुळे समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांची जीवित हानी तसेच नौकांचे नुकसान टाळण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्ट पर्यंत करण्याची रास्त मागणी उपस्थित मच्छिमारांकडून करण्यात आली आहे.

मंत्री नितेश राणेंनी सदर मागणी योग्य असल्याचे उपस्थित मच्छिमारांना सांगून गुजरात राज्याच्या धर्तीवर पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्ट पर्यंत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे आश्वासन मच्छिमार शिष्टमंडळाला देण्यात आले. 

तसेच पुढील आठवड्यात गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ केंद्रीय मत्स्यवयसाय मंत्र्यांना भेटून संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पुढील वर्षापासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे देखिल आश्वासन त्यांनी उपस्थित कोळी बांधवांना दिले.

 त्याचबरोबर अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांचे वर्षभर परवाने रद्द करणे तसेच कागदपत्र नसलेल्या बोटी नष्ट करण्या विषयी चर्चा झाली असून कायद्यात तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.

 

Web Title: Extend fishing ban till August 15 Fishermen request Minister Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.