Exclusive Interview: ...No time for end of art.! Dr. Bharat Ballawalli | विशेष मुलाखत: ...तर कलेचे 'कलेवर' व्हायला वेळ लागत नाही! डॉ. भरत बल्लवली

विशेष मुलाखत: ...तर कलेचे 'कलेवर' व्हायला वेळ लागत नाही! डॉ. भरत बल्लवली

ठळक मुद्देविनामूल्य ऑनलाइन सादरीकरण करताना किती गोष्टी दाखवाव्यात, याचा कलाकाराने करावा विचार

प्रज्ञा केळकर-सिंग-
कुठलीही कला जेव्हा विनामूल्य सादर केली जाते, तेव्हा त्या गोष्टीचे मोल राहत नाही आणि कलेचे कलेवर व्हायलाही वेळ लागत नाही. विनामूल्य सादर केलेली कला हे व्यावसायिक अधोगतीला दिलेले आमंत्रण आहे. आपण संगीतक्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहोत आणि थोड्याफार प्रमाणात का होईना कायम प्रेक्षकांसमोर येत राहण्यात काहीच चुकीचे नाही. पण विनामूल्य ऑनलाइन सादरीकरण करताना किती गोष्टी दाखवाव्यात, याचा प्रत्येक कलाकाराने विचार करावा. ऑनलाइन मैफिली हा भविष्यातला पर्याय असू शकतो मात्र, अर्थार्जनासाठी त्याची व्यवस्थित पद्धतीने आखणी केली गेली तरच, अशा शब्दांत प्रसिद्ध गायक डॉ. भरत बल्लवली यांनी सध्याच्या विनामूल्य ऑनलाईन सादरीकरणावर परखड भाष्य केले.
----
१) कोरोनाचा काळ कला क्षेत्राला कितपत मारक ठरू शकेल?
- आज प्रत्येक माणूस आपल्या क्षमतेप्रमाणे कोरोना महामारीशी लढत आहे. व्यावसायिकदृष्ट्या फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे कार्यक्रम आणि रेकॉर्डिंग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक कलाकार हा सर्व बाजूंनी आर्थिक नुकसान झेलत आहे. कला, नाट्य, अभिनय किंवा संगीत हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असला तरी थिएटरपर्यंत न गेल्यामुळे प्रेक्षकांच्या आयुष्यात त्यांना फारसा फरक पडत नाही. सरकारी नियमांमध्ये कला ही अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत येत नाही. त्यामुळे निश्चितच त्याला शेवटचे प्राधान्य दिले जाते आणि दुसरे कारण असे की कोरोनामुळे जागतिक आर्थिक मंदी आली असल्याने आयोजक असोत किंवा प्रायोजक, सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत चालू होत नाहीत, तोपर्यंत थांबून राहणे ही प्रत्येकाची प्राथमिक गरज होऊन बसली आहे. ही वेळ मारक आहे की तारक आहे हे प्रत्येक कलाकाराच्या त्याच्या कलेकडे आणि व्यावसायिक सिद्धतेकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. माज्या मते ही वेळ व्यावसायिकदृष्ट्या कठीण असली तरी आपल्या कलेचे आणि ग्रहण करत असलेल्या विद्येचे आत्मचिंतन करून, स्वत:वर अधिक मेहनत घेऊन, डोळस रियाज करून कला परिपक्व बनवण्यासाठी ही वेळ नक्कीच तारक ठरेल.
 

२) रसिकांना कलेचे सादरीकरण मोफत मिळू लागले तर कलेचे महत्व कमी होईल असे वाटते का?
- कुठलीही कला जेव्हा विनामूल्य सादर केली जाते, तेव्हा त्या गोष्टीचे मोल राहत नाही आणि कलेचे कलेवर व्हायलाही वेळ लागत नाही. विनामूल्य सादर केलेली कला हे व्यावसायिक अधोगतीला दिलेले आमंत्रण आहे. आपण संगीतक्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहोत आणि थोड्याफार प्रमाणात का होईना कायम प्रेक्षकांसमोर येत राहण्यात काहीच चुकीचे नाही. पण विनामूल्य ऑनलाइन सादरीकरण करताना किती गोष्टी दाखवाव्यात, याचा प्रत्येक कलाकाराने विचार करावा. ऑनलाइन मैफिली हा भविष्यातला पर्याय असू शकतो मात्र, अर्थार्जनासाठी त्याची व्यवस्थित पद्धतीने आखणी केली गेली तरच!

३) संगीत मैफिली बंद झाल्याने रसिक आणि कलाकार यांच्या नात्यावर काय परिणाम होईल?
- संगीत कला ही अशी गोष्ट आहे जी समोर बसून प्रत्यक्ष अनुभवली तर त्याची मजा असते. स्वरांचा प्रभाव हा समोर बसून ऐकताना जास्त अनुभवता येतो. कारण त्यामध्ये कलाकाराने वातावरण त्याच्या अपेक्षित सिद्धांताप्रमाणे सिद्ध केलेले असते. प्रेक्षक आणि कलाकार हे अमरत्वाला पोहोचलेले नाते असून ते कधीही संपू शकत नाही. युट्युब, सावन, गाना डॉट कॉम यासारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एखाद्या कलाकाराची गाणी ऐकूनही त्या कलाकाराचा कार्यक्रम एखाद्या थिएटरमध्ये लागतो तेव्हाही प्रेक्षक महाग तिकीट काढून उपस्थित राहतात तर ते त्या कलाकाराचे व्यावसायिक यश आहे, असे समजले जाते. आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किती परफॉर्म करावं हा प्रत्येक कलाकाराचा वैयक्तिक विषय असला तरी नवोदितांपासून ते प्रथितयश कलाकारांपर्यंत ऑनलाईन येण्याची कारणं आणि गरजा वेगवेगळ्या असतात. 
 

४) प्रथितयश आणि नवोदित कलाकारांनी केलेल्या ऑनलाईन सादरीकरणातील तफावत कशी असते?
- प्रतिथयश कलाकारांनी छोटीशी झलक आणि बोधात्मक सांगीतिक विचार प्रस्तुत केले तरी पुरेसे असते. परंतु, नवोदित कलाकारांना मात्र नुसती झलक न देता पूर्णपणे त्यांची सांगीतिक प्राविण्य दर्शवावे लागते. या प्रक्रियेमध्ये नवोदित कलाकारांना प्रेक्षकांनी ऑनलाइन पाहिल्यामुळे त्यांचा कार्यक्रम थिएटरमध्ये जाऊन अनुभवायला फार कमी संख्येने प्रेक्षक उत्सुक असतात. म्हणून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुम्ही विनामूल्य येता, तेव्हा तुम्ही तुमची कला किती दर्शवली तर प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण होईल आणि तो नवोदित कलाकारांच्या कार्यक्रमाला कसा येईल, याचा विचार प्रत्येक कलाकाराने केला पाहिजे. कुठलेही सादरीकरण उच्च पातळीवर नेण्याची जबाबदारी जशी कलाकारांचे असते तशी श्रोत्यांची असते. म्हणून सर्व प्रकारच्या व्यावसायिक शिस्त पाळून जेव्हा कुठलीही कला सादर केली जाते, तेव्हा कलाकार आणि प्रेक्षक या दोघांनाही आत्मानंदाची अनुभूती होते. हाच आत्मानंद कलाकार आणि रसिक यांचे नाते अजून परिपक्व करतो.
 

५)  'भरतवाक्य' या आगामी पुस्तकाबद्दल काय सांगाल?
- 'भरतवाक्य' हे पुस्तक माज्या सांगीतिक, आध्यात्मिक विचारांवर आधारित आहे. कलेमार्फत समाजनिर्मिती आणि आत्मरंजन कसे करता येईल, याचे मला उमजलेल्या रसांचे वर्णन आहे. मी करत असलेली स्वरांची उपासना असो, स्वरांचे झालेले विश्वरूपदर्शन असो, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचा माज्या गळ्यावर झालेला परिणाम असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांविषयी किंवा सावरकर विचारदर्शन असो, यासारख्या अनेक विषयांवर आधारित असलेले 'भरतवाक्य' हे बहुआयामी पुस्तक सर्वांच्या भेटीला लवकरच येत आहे. मुळात मला सूर कसे दिसतात, याचे रहस्य सांगून जाणारे हे पुस्तक असून मला विश्वास आहे की या उपक्रमाला वाचकांचा आणि माज्या संगीतप्रेमी चाहत्यांचा नक्कीच मिळेल.

Web Title: Exclusive Interview: ...No time for end of art.! Dr. Bharat Ballawalli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.