अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:23 IST2025-10-07T16:22:10+5:302025-10-07T16:23:27+5:30
Maharashtra Flood Exam fee Waive Off: अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
Devendra Fadnavis Latest News: सप्टेंबर अखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली पिके सडली. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरणंही कठीण असून राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. तब्बल दोन हजार ६९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्याने २९ जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे.
शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षेचे शुल्क माफ
अतिवृष्टी झाल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती. राज्य सरकारने असा निर्णय घेणे नियमानुसार शक्य नसल्याचे स्पष्ट केले. मात्र दुष्काळाच्या काळात ज्या उपाययोजना केल्या जातात, त्या केल्या जाणार असल्याचे जाहीर केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ओला दुष्कार जाहीर करण्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात आम्ही जी घोषणा केली होती, त्यानुसार टंचाई ज्याला आपण दुष्काळ म्हणतो. त्या काळातील ज्या उपाययोजना आहेत. ओला दुष्काळ समजून त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यात जमीन महसूलात सूट, कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाचे वीज बिल लागत नाहीये, त्यामुळे तो विषय संपला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करणार आहोत', अशी माहिती फडणवीसांनी दिली.
राज्य सरकारकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीचा २९ जिल्ह्यांना फटका बसला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ केले जाणार आहे.
या निर्णयाचा मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
शेतकऱ्यांना किती रुपये नुकसान भरपाई मिळणार?
मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे कोरडवाहूला प्रति हेक्टर ८५०० रुपये देतो, हंगामी बागायतीला प्रति हेक्टर १७००० रुपये, तर बागायतीला प्रति हेक्टर २२००० रुपये देतो. त्याप्रमाणे जवळपास ६२ लाख हेक्टर करता ६ हजार १७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शेतकऱ्यांना रब्बीचे पिक घेता यावे, त्यासाठी बियाणे आणि इतर गोष्टींसाठी प्रति हेक्टर अतिरिक्त दहा रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहे. यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपये लागणार आहेत. दहा हजाराची ही रक्कम पकडून कोरडवाहू शेतकऱ्याला हेक्टरी १८५०० रुपये मिळतील, हंगामी बागायती शेतकऱ्याला हेक्टरी २७००० रुपये मिळतील. बागायतदार शेतकऱ्याला ३२५०० रुपये मिळणार आहेत.