माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 10:50 IST2025-07-22T10:47:42+5:302025-07-22T10:50:10+5:30
Agriculture Minister Manikrao Kokate Rummy Game Playing Video Viral News: शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना कृषिमंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यानंतर विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
Agriculture Minister Manikrao Kokate Rummy Game Playing Video Viral News: नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाइलवर रमी हा पत्त्यांचा ऑनलाइन गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना कृषिमंत्र्यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो दिवसभर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर महाविकास आघाडीसह विरोधकांनी माणिकराव कोकाटेंवर सडकून टीका केली. तसेच कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणीही लावून धरली.
व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, गेम स्किप करत कोणीतरी गेम डाउनलोड केला होता, तो स्किप करत होतो. विधानसभेचे कामकाज पाहिले. ते दिसले नाही म्हणून फोन ठेवून दिला, असे कोकाटे म्हणाले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांची पत्रपरिषद सुरू असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खासदार तटकरे यांच्यासमोर खेळण्याचे पत्ते उधळले. तुमच्या मंत्र्यांना विधानसभेत नव्हे तर घरी पत्ते खेळायला सांगा, असे म्हणत निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर अजित पवार गट आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. परंतु, माणिकराव कोकाटे रमी खेळताना कोणी व्हिडिओ काढला, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बोलले जात आहे.
रमी खेळताचा व्हिडिओ कोणी केला?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधान भवनात मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून माध्यमांनी त्यांना टीकेचे लक्ष केले. प्रश्न वेगळाच आहे. हा व्हिडीओ त्यांच्या मागे बसणाऱ्याने काढला की प्रेक्षक गॅलरीतून काढला? विधानभवनातील बैठक व्यवस्थेनुसार मंत्री महोदयांच्या मागे मंत्रीच बसतात. त्यामुळे त्यांच्या मागे बसणाऱ्या त्यांच्याच कोणी परममित्राने हा व्हिडीओ काढून तो रोहित पवार यांना दिला का? कोकाटे यांची इतकी कनिष्ठ मैत्री नेमकी कोणासोबत आहे या संपूर्ण प्रकरणाची खरे तर विधानसभा अध्यक्षांनी चौकशीच लावली पाहिजे... उगाच कोकाटेंवर एकतफीं अन्याय नको..., अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, 'मी रमी खेळत नव्हतो, अचानक जाहिरात पॉपअप झाली', असे त्यांनी सांगितले असले तरी जे घडले ते भूषणावह नाही, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना सुनावले. विधिमंडळात जेव्हा चर्चा चालते तेव्हा आपले कामकाज नसले तरीही आपण गांभीर्याने बसणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस तुम्ही कागदपत्रे वाचता; पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हे निश्चितच योग्य नाही, हे अतिशय चुकीचे आहे, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.