‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:42 IST2025-07-15T19:05:07+5:302025-07-15T19:42:30+5:30
Harshvardhan Sapkal: मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
मुंबई - मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही मारहाण करणार नाही तर मराठी शिकवू व ती टिकवू. महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच आहेत या मराठीला हात लावाल तर खरबरदार, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” मराठी भाषा कार्यशाळेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, भावना जैन, रमेश शेट्टी, मराठी भाषा विभागाचे दीपक पवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यासह हजारो मराठीप्रेमी जनता उपस्थित होती.
या कार्यक्रमात पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हिंदी सक्तीचा जो नंगानाच घातला गेला त्याचा उगम माजी सरसंघचालक गोलवकर यांच्या बंच ऑफ थॉट पुस्तकातून आलेला आहे. भाजपा व संघाला भारताचे संविधान मान्य नाही, विविधतेत एकता ही आपली ओळख आहे तर भाजपाला मात्र वन नेशन वन इलेक्शन, वन लँगवेज आणायची आहे. विविधता नाकारणारी विखारी व विषारी अशी ही संकल्पना बंच ऑफ थॉटमधून आलेली आहे. हिंदी, हिंदुत्व व हिंदुराष्ट्र ही संकल्पना भाजपा व संघाला राबवायची आहे, त्यासाठीच भाजपा सरकारने हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणलेला आहे.
या कार्यक्रमासाठी मीरा रोडच का निवडले हे सांगताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचे भूमिका नरोवा कुंजरोवा ची नाही. येथे पाय रोऊन ठामपणे भूमिका मांडण्यासाठी आलो आहे. ही विचाराची लढाई आहे, आम्ही मराठी, आम्ही भारतीय, हा संदेश देण्यासाठी मीरा रोडला आलो आहोत. मी मराठी बोलणार नाही हा माज योग्य नाही तसेच का बोलत नाही म्हणून मारणे हे सुद्धा चुकीचेच आहे. हिंदी सक्तीने शिक्षणाचे वाट्टोळे होणार आहे आणि पुढे जाऊन सक्तीचे मोफत शिक्षण कायदा सुद्धा रद्द केला जाऊ शकतो असे सपकाळ म्हणाले.
प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यावेळी म्हणाले की, आता राम मंदिराचा मुद्दा संपलेला आहे त्यामुळे भाजापाने जातीवाद, प्रांतवाद व भाषावाद सुरु केला आहे. काँग्रेस सरकारने ७० वर्षात निर्माण केलेली देशाची संपत्ती विकली जात असताना तसेच जनतेचे मुलभूत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाषावाद सारखे मुद्दे उकरून काढले जात आहेत. या भागात इतर राज्यातून लोक आले व महाराष्ट्राने त्यांना आपले करून घेतले कोणालाही जात, धर्म भाषेवरून वेगळी वागणूक दिली नाही. पण भाजपाने जाणीवपूर्वक भाषा वाद सुरु केला आहे त्यामागे राजकीय स्वार्थ आहे असे ते म्हणाले.
मराठी भाषा विभागाचे डॉ. दीपक पवार म्हणाले की, आंदोलन हे तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात होते पण सरकाराला मात्र ते हिंदी विरोधी करायचे होते. सरकारने आता दोन जीआर रद्द केले असले तरी त्यांनी डॉ. नरेंद्र जाधव यांची समिती स्थापन केली आहे परंतु डॉ. नरेंद्र जाधव समितीने काहीही अहवाल दिला तरी तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आमचा विरोधच राहिल. पहिलीपासून हिंदी शिकवली तर मराठी ही हिंदीची पोटभाषा होईल. महाराष्ट्रावर व मराठीवर प्रेम करणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजकाल मुंबईबदद्ल बोलत नाहीत तर MMRDA बद्दल बोलतात. या भागात उत्तर भारतीयांची लोकसंख्या जास्त प्रमाणात आहेत. MMRDA वेगळे राज्य करण्याचा धोका आहे आणि हा धोका हिंदी सक्तीच्या पोटात आहे, त्यामुळे मराठीची फरफट तर होणारच अशी भितीही दीपक पवार यांनी व्यक्त केली