संभाजी बिडीचे नाव बदलणार!शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या वाढत्या दबावापुढे साबळे-वाघिरे कंपनी झुकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 19:26 IST2020-09-10T19:17:13+5:302020-09-10T19:26:39+5:30
विविध शिवप्रेमी संघटनांनी विडीचे नाव बदलण्यासाठी साबळे-वाघिरे कंपनीवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला होता.

संभाजी बिडीचे नाव बदलणार!शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या वाढत्या दबावापुढे साबळे-वाघिरे कंपनी झुकली
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विक्रीस आणल्यानंतर संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाउंडेशन, व इतर शिवप्रेमी संघटना व जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता.तसेच बिडीचे नाव बदलण्यासाठी पुरंदरच्या पायथ्याशी आंदोलन करून सासवड पोलीस ठाण्यात साबळे-वाघिरे कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिवसेंदिवस विडीवरचे संभाजी महाराजांचे नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली होती. वाढता रोष व शंभूप्रेमी संघटना व लोकभावनेचा आदर करून अखेर कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्यात येणार निश्चित केले आहे, अशी माहिती साबळे आणि वाघिरे कंपनीचे संचालक संजय साबळे यांनी दिली आहे.
बिडीला देण्यात आलेल्या संभाजी महाराजांचे नाव बदलण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. आमदार नितेश राणे, आमदार रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे बिडीला संभाजी महाराजांचे नाव वापरण्यावर जोरदार आक्षेप नोंदवला होता. तसेच विविध संघटनांनी नाव बदलण्यासाठी साबळे-वाघिरे कंपनीवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला होता.त्यामुळे ह्या कंपनीने अखेर नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी संजय साबळे म्हणाले, आम्ही आमच्या उत्पादनाचे नाव बदलण्याचे निश्चित केले आहे. मात्र त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. जी काही चार ते पाच नावे आमच्याकडे आली आहे त्यापैकी एका नावाची लवकरात लवकर नोंदणी करून उत्पादन आणि विक्री सुरू करण्यात येईल.
आम्ही वेळोवेळी शिवप्रेमींच्या भावनांचा आदर केला आहे. मात्र, आमचा बिडी निर्मितीचा व्यवसाय हा ९० वर्षांहून अधिक जुना आहे. तसेच या व्यवसायावर ६० ते ७० हजार कामगारांचा प्रपंच सुरू आहे. त्यामुळे तडकाफडकी उत्पादन व विक्री थांबवली तर त्या कुटुंबांना खूप मोठा फटका बसेल तसेच कंपनीचेही अतोनात नुकसान होईल. त्यामुळे आम्ही बिडीचे नाव बदलणार आहोत फक्त शिवप्रेमी संघटनांनी थोडे सहकार्य करावे असेही संजय साबळे यांनी सांगितले आहे.