या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 10:38 IST2025-09-29T10:37:36+5:302025-09-29T10:38:31+5:30
कुठलीही गोष्ट आली की आम्ही केली असं ते सांगत असतात. याची त्यांना लाज वाटली पाहिजे. अनेक योजना आम्ही आणल्या आहेत असा टोलाही आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंना लगावला.

या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
रायगड - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतील २ पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून आधीच शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. बऱ्याचवेळा येथील शिंदेसेनेचे आमदार आणि सुनील तटकरे यांच्यात वादाचे खटके उडत असतात. त्यातच शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर बोचरी टीका करतानाच या नालायकांबरोबर युती करणार नाही असं एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचं भाषणात म्हटलं आहे.
आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, आपल्या इथे काम करणाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. युवकांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे निश्चित त्याची धडकी काहींच्या मनात बसली आहे. त्यामुळे ते वेगळ्या भूमिकेतून जाताना दिसतात. रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कशी महायुती घडेल याचा ते प्रयत्न करतायेत. परंतु आम्ही १०० टक्के सांगितले आहे, भरतशेठ, मी असेल किंवा महेंद्र थोरवे यांनी आमचे वरिष्ठ एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे..या नालायकांबरोबर आम्ही कधीही युती करणार नाही. आम्ही शिंदेसोबत आहोत. भलेही भाजपाने त्यांना घेवो अन्यथा नाही तेवढी ताकद आम्ही निर्माण केली आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच कुठलीही गोष्ट आली की आम्ही केली असं ते सांगत असतात. याची त्यांना लाज वाटली पाहिजे. अनेक योजना आम्ही आणल्या आहेत. त्या कागदावर आमच्या नावाने आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना निधी मिळाला पाहिजे. तुमचा फायदा इतर कुणी घेतंय हे आम्हाला मान्य होणार नाही. सध्याचे सणाचे दिवस आहेत. नवरात्रीनंतर दिवाळी येतेय, दिवाळीत असा फटाका वाजवा तटकरे घरातून बाहेर पडायला पाहिजेत असंही आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले.
दरम्यान, महेंद्र दळवी यांना २०१२ साली सुनील तटकरे यांनीच राष्ट्रवादीचं तिकिट देत जिल्हा परिषदेचे सदस्य बनवले. आज जे दळवी दिसतात ते तटकरेंमुळेच दिसत आहेत. सुनील तटकरेंवर काहीतरी चिखलफेक करायची आणि स्वत:चे नाव मोठे करायचे असे प्रयत्न सातत्याने महेंद्र दळवी, थोरवे यांचे सुरू असतात. रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांच्या कार्याचा दबदबा आहे असं काही दिवसांपूर्वी रायगडचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी म्हटले होते.