हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत!

By Admin | Updated: December 29, 2014 05:59 IST2014-12-29T05:59:07+5:302014-12-29T05:59:07+5:30

दीडशे उंबरे... लोकसंख्या ८५०... गावात एकच सार्वजनिक विहीर... तिनेही तळ गाठलेला... ६० फूट विहिरीत उतरण्याची सोय नाही

Effortless workout! | हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत!

हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत!

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई (बीड) - दीडशे उंबरे... लोकसंख्या ८५०... गावात एकच सार्वजनिक विहीर... तिनेही तळ गाठलेला... ६० फूट विहिरीत उतरण्याची सोय नाही... त्यामुळे कमरेला दोरी बांधून चिमुरड्यांना आत सोडायचे... हंडा भरल्यावर एका हातात दोरी अन् दुसऱ्या हातात भांडे धरलेल्या मुलांना बाहेर काढायचे... हंडाभर पाण्यासाठी दररोज अख्ख्या गावाचा जीव टांगणीला असतो.
अंबाजोगाई तालुक्यातील मुरकुटवाडी येथील या जीवघेण्या कसरतीवरून मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता समजू शकते. मुरकुटवाडी गावात अजूनही पाणी योजना राबविलेली नाही. एकाच विहिरीवर संपूर्ण गावाला तहान भागवावी लागते. तीन वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. यंदा पावसाअभावी पीक तर आले नाहीच, मात्र गावाचा पाण्याचा स्रोत असलेल्या विहिरीनेही नोव्हेंबरमध्ये तळ गाठला. गावातील दोन हातपंप व बोअरवेलही कोरडेठाक पडल्याने विहिरीत झिरपणाऱ्या पाण्यावरच सर्वांची मदार आहे. विहिरीत उतरता येत नसल्याने पोटच्या लेकरांच्या कमरेला दोरी बांधून आत सोडायचे. त्यांनी ग्लासच्या साहाय्याने हंडा भरला की हातातील भांड्यासह त्यांना ओढायचे, असा पालकांचा दिनक्रम असतो.

Web Title: Effortless workout!