Education: पुढील बुधवारपासून चला कॉलेजला! ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने भरणार वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:06 IST2021-10-14T12:05:38+5:302021-10-14T12:06:13+5:30
College: लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नाट्यगृहे, चित्रपटगृहे विश्व खुले होत आहे. आता महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.

Education: पुढील बुधवारपासून चला कॉलेजला! ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने भरणार वर्ग
मुंबई : लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नाट्यगृहे, चित्रपटगृहे विश्व खुले होत आहे. आता महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. त्यासाठी नियम जिल्हानिहाय स्वतंत्र असतील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
महाविद्यालये सुरू करण्याचा आदेशही बुधवारी जारी झाला. मार्च २०२० पासून बंद महाविद्यालयांची दारे आता उघडणार आहेत. विद्यापीठ/ महाविद्यालयांचे वर्ग ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरू करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणांशी चर्चा करून विद्यापीठांनी निर्णय घ्यावा, असे या आदेशात म्हटले आहे.
लसीचे दोन्ही डोस घेतलेले १८ वर्षे वयावरील विद्यार्थी महाविद्यालयात हजर राहू शकतील. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन अनिवार्य असेल. उपस्थित राहता न येणाऱ्यांना ऑनलाईन सुविधा मिळेल. वसतिगृहे टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाचे संचालक, तंत्रशिक्षण संचालक आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करतील.
लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठांनी संस्थाचालक, प्राचार्य यांच्या मदतीने व जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणाची मोहीम राबवावी. विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे. प्रतिबंधित क्षेत्रातील महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने विद्यापीठ व प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.
मुंबई आणि परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा अद्यापही नाही. त्यामुळे २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू होणार असली तरी, त्यांना महाविद्यालयांत उपस्थित राहण्यात अडचणी येणार आहेत. या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी, अशी विनंती रेल्वे विभागाला राज्य शासनाकडून केली जाईल.
- उदय सामंत,
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री