राेहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच; बारामती ॲग्राेची ५० कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 07:03 IST2024-03-09T07:03:07+5:302024-03-09T07:03:42+5:30
संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतल्याचा आरोप...

राेहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच; बारामती ॲग्राेची ५० कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कंपनीशी संबंधित मनी लाॅंड्रिंग प्रकरणात कंपनीच्या मालकीच्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची ५०.२० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने कारखान्याशी संबंधित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे असलेली १६१.३० एकर जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे.
तपासात काय आले समाेर?
कमी राखीव किंमत निश्चित करून कन्नड एसएसकेचा लिलाव केल्याचे समोर आले. बारामती ॲग्रो लि.च्या व्यतिरिक्त अन्य दोघांनी लिलावात सहभाग घेतला होता. यात सर्वांत जास्त बोली लावणारा बोलीदार तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरला, तर दुसरा बोलीदार बारामती ॲग्रो लि.च्या जवळचा व्यावसायिक सहकारी होता. ज्यांची आर्थिक क्षमता कमी होती, तसेच साखर कारखान्याचा अनुभव नव्हता.
माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का? पण भाजपने लक्षात ठेवावं, झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत.
- रोहित पवार
काय आहे आरोप?
दाखल गुन्ह्यात एमएससी बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी त्यांचे नातेवाईक, खासगी व्यक्तींना योग्य प्रक्रियेचे पालन न करता एसएसके मिलची लिलावात विक्री करून फसविल्याचा आरोप आहे.
‘कन्नड एसएसके’चे बेकायदा संपादन केल्याचा ठपका
बारामती ॲग्रो लि.ने कन्नड एसएसकेचे संपादन बेकायदा केले होते. त्यामुळे कंपनीने मिळवलेली मालमत्ता पीएमएलए कायद्याच्या कलम २(आय)(यू) अन्वये गुन्ह्याची रक्कम असल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले.
कन्नड एसएसकेची ५०.२० कोटी
रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या ताब्यात घेण्यात आल्याचे ईडीने सांगितले. या प्रकरणात याआधी तीन वेळा एकूण १२१.४७ कोटींच्या मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्याचे आदेश जारी केले गेले आहेत. याबाबत विशेष पीएमएलए न्यायालय, मुंबई यांच्यासमोर कन्नड एसएसकेने चुकीच्या पद्धतीने संपादन केल्याबद्दल तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांची न्यायालयाने आधीच दखल घेतली असून पुढील तपास सुरू असल्याचे ईडीने सांगितले.