Phaltan Doctor Death: फलटण डॉक्टर प्रकरणात सुषमा अंधारेंचा मोठा दावा; अश्विनी बिद्रे प्रकरणाचा दाखला देत म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:20 IST2025-10-30T14:19:44+5:302025-10-30T14:20:57+5:30
मयत डॉक्टर तरुणीच्या सुसाइड नोटमधील ‘त्या’ एका शब्दाने केस फिरणार?

Phaltan Doctor Death: फलटण डॉक्टर प्रकरणात सुषमा अंधारेंचा मोठा दावा; अश्विनी बिद्रे प्रकरणाचा दाखला देत म्हणाल्या...
Dr. Sampada Munde Case: फलटण येथे कार्यरत डॉ. संपदा मुंडे आत्महत्येच्या प्रकरणात चौकशी सुरू असतानाच पोलीस काहीतरी लपवत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. मयत तरुणीच्या हातावरील आणि सुसाइड नोटमधील ‘निरीक्षक’ या शब्दातील हस्ताक्षर जुळत नसल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे.
‘निरीक्षक’ शब्द प्रकरणाचा गूढ उलगडणार का?
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, “हातावरील अक्षर आणि तक्रार पत्रातील अक्षरांमधील फरक पाहता ही आत्महत्या की हत्या, असा प्रश्न निर्माण होतोय. अंधारे यांनी महाराष्ट्रातील बहुचर्चित अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, त्या प्रकरणात केवळ ‘Y’ आणि ‘U’ या दोन शब्दांनी गुन्ह्याचे गूढ उलगडले होते. त्याचप्रमाणे आता फलटणच्या डॉक्टर युवतीच्या प्रकरणातही ‘निरीक्षक’ हा शब्द तपासात निर्णायक ठरू शकतो, असे त्यांनी सुचवले. यासोबतच त्यांनी अश्विनी बिद्रे यांच्या पतीचा एक व्हिडिओही आपल्या एक्स अकाउंवर पोस्ट केला आहे.
अश्विनी बिद्रे यांचे पती काय म्हणाले? पाहा व्हिडिओ...
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी हस्ताक्षरातील फरकावरून अश्विनी बिद्रे प्रकरणाचा दाखला दिला होता.
— SushmaTai Andhare (@andharesushama) October 29, 2025
हे केस ज्यांनी लढली ते अश्विनी बिद्रे यांचे पती श्री गोरे साहेब यांनी माझ्या म्हणण्याला पुष्टी देत नवा धक्कादायक खुलासा केला.
सध्या सातारा एसपी असलेले तुषार दोशी हेच अश्विनी बिद्रे… pic.twitter.com/cfqd5218pg
आरोपींना ‘क्लिनचिट’ देण्याचे प्रयत्न
पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला आयोगावरही निशाणा साधला. “आरोपींची चौकशी करण्याऐवजी त्यांना क्लिनचिट देण्यासाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी प्रयत्न होत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी विचारले की, “तरुणीच्या हातावर लिहिलेला संदेश नेमका कुणी लिहिला? सुसाईड नोट तिच्याच हस्ताक्षरात आहे का?” या प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी स्पष्ट करावी.
‘डिटेल्स’ चाकणकर यांच्याकडे कशा?
अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “घटना घडल्यानंतर पोलिसांकडून जप्त केलेला मुद्देमाल गोपनीय असतो. मोबाईल, कॉल रेकॉर्ड्स किंवा चॅट डिटेल्स न्यायालयाच्या परवानगीशिवाय उघड करता येत नाहीत. मग ती माहिती चाकणकर यांना कशी मिळाली? पोलिसांनी द्यायची माहिती त्यांनी का दिली? त्यांना तो अधिकार कुणी दिला?” असा सवाल अंधारेंनी विचारला.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातही सुरुवातीला पोलिसांनी तपासात ढिलाई दाखवली होती. आरोपीकडून बिद्रेंच्या मोबाईलवरुन चॅट सुरुच ठेवण्यात आले होते. मात्र चॅटमधील ‘Y’ आणि ‘U’ या दोन शब्दांनी पोलिसांना संशय आला आणि त्या धाग्याने पुढे जाऊन प्रकरण उलगडले. त्याचप्रमाणे अंधारे यांनी आशा व्यक्त केली की, ‘निरीक्षक’ हा शब्द फलटणच्या डॉक्टर युवतीच्या मृत्यूचा सत्य उलगडण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.