'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:22 IST2025-04-22T15:20:59+5:302025-04-22T15:22:11+5:30
निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यात कलगीतुरा रंगला. महायुतीत बाहेर जावं, या सावेंच्या विधानावर कदमांनीही रोखठोक भूमिका मांडली.

'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
Baburao Kadam Kohalikar Atul Save: मराठवाड्यात निधी वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीतील दोन नेते भिडले. इतके की एकाने आमच्याकडे २३७ आमदार असल्याचे सांगत युतीतून बाहेर पडा, अशा शब्दात डिवचले. तर दुसऱ्यानेही लागलीच ते २३७ एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडून आलेत. त्यामुळे माज करू नका, असे सांगत टीकेचे बाण डागले. हे घडलं आहे नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे आणि हदगावचे शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यात!
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तांडा वस्ती निधी वाटपाच्या मुद्द्यावर बाबूराव कदम कोहळीकर मंत्री अतुल सावे यांच्यावर नाराज झाले. त्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांचा निषेध करून असेही ते म्हणाले होते. कदमांच्या या भूमिकेनंतर मंत्री अतुल सावेही आक्रमक झाले.
"मी याची खूप काळजी करत नाही. पाच वर्षे आमच्याकडे २३७ आमदार आहेत. आणि आम्ही युतीत काम करतोय. ज्याला युतीत राहायचं नसेल, ते बाहेर पडतील", असे म्हणत अतुल सावेंनीही आमदार बाबूराव कदम कोहळीकरांना डिवचलं.
शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडून आलेत, संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये
आपल्याच सरकारमधील मंत्री असलेल्या अतुल सावेंनी थेट पटत नसेल, तर युतीतून बाहेर पडा असा सल्लाच प्रत्यक्षपणे दिल्याचे बाबूराव कदमांच्या जिव्हारी लागले. त्यांनीही महायुतीच्या २३७ आमदारांचा उल्लेख करत सावेंना माज करून नका, असा इशारा दिला.
आमदार बाबूराव कदम कोहळीकर म्हणाले, ""हे २३७ चे जे बहुमत मिळाले, त्याचा कुणीही माज करू नये. कारण विधानसभेच्या निवडणुकीवेळी कुणाच्या चेहऱ्यामुळे २३७ चा आकडा पार केला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मंत्रिमहोदयांनी सुद्धा एकदा जनतेमध्ये जाऊन विचारावं की, २३७ कशामुळे मिळाले?"
२३७ चं यश हे एकनाथ शिंदेंमुळे मिळालं
"ज्यावेळी कुठलाही निधी मंत्री मंजूर करतात, त्यावेळी तिथल्या स्थानिक आमदारांना विचारलं तरी पाहिजे. कमीत कमी आम्ही तुमच्याकडे इतके देत आहोत, असं सांगितलं पाहिजे. असा प्रकार कुठेही झाला नाही. परत एकदा सांगू इच्छितो की, २३७ फक्त एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर करून यश आलेलं आहे. याचा कुणीही गर्व आणि अभिमान करू नये", असा पलटवार बाबूराव कदम कोहळीकरांनी अतुल सावेंवर केला.