डॉक्टरांचे असहकार आंदोलन

By Admin | Updated: May 27, 2014 01:43 IST2014-05-27T01:43:44+5:302014-05-27T01:43:44+5:30

महाराष्टÑ राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) डॉक्टरांनी सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सुमारे ३००

Doctor's Non-Cooperation Movement | डॉक्टरांचे असहकार आंदोलन

डॉक्टरांचे असहकार आंदोलन

मॅग्मो : डॉक्टरांनी काळ्या फिती लावून केले काम

नागपूर : महाराष्टÑ राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) डॉक्टरांनी सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सुमारे ३०० डॉक्टरांनी आज काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. सोबतच सरकारला दर दिवसाला पाठविण्यात येणारा आरोग्याचा ताळेबंद माहिती (मेडिकल इन्फर्मेशन सिस्टीम) व बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. राज्यातील ८० टक्के जनता गावखेड्यात राहते. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांवर आहे. परंतु राज्यातील १२ हजार तर विदर्भातील साडेतीन हजार वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या मागण्यांकडे शासन वेळोवेळी दुर्लक्ष करीत आले आहे. विशेषत: सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीला घेऊन या अधिकार्‍यांवर अन्याय झाल्याचा संघटनेचा आरोप आहे. केंद्र सरकार तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांना वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीला घेऊन ‘मॅग्मो’ने २०११ मध्ये संप पुकारला होता. यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेतनश्रेणी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. संघटनेने दोन वर्षे आश्वासन पूर्ततेची वाट पाहिली, परंतु शासन दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आल्यावर, आजपासून असहकार आंदोलन सुरू केले. महाराष्टÑ राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रमोद रक्षमवार यांनी सांगितले. २६ ते ३१ मे दरम्यान हे असहकार आंदोलन सुरू राहील. आज पहिल्याच दिवशी नागपूर विभागातील सुमारे २२०० तर जिल्ह्यातील ३०० वैद्यकीय अधिकार्‍यांनी काळ्या फिती लावून काम केले. यासोबतच ‘मेडिकल इन्फर्मेशन’ व बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला. १ जूननंतर हे आंदोलन आणखी तीव्र होईल, असेही ते म्हणाले. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. रक्षमवार, जिल्हा मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. विद्याधर गायकवाड आणि सचिव डॉ. हर्षवर्धन मानेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Doctor's Non-Cooperation Movement