भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:24 IST2025-11-21T18:21:26+5:302025-11-21T18:24:50+5:30
BJP Chandrashekhar Bawankule News: गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली ठाकरेंची सत्ता उलथवून आपला महापौर बसवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे.

भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
BJP Chandrashekhar Bawankule News: येत्या काही महिन्यात होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली ठाकरेंची सत्ता उलढवून लावत सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत आपल्या महापौर बसवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. दरम्यान, या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला १०० हून अधिक जागांवर विजय मिळू शकतो, असा दावा पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमधून करण्यात आला आहे. यातच आता भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात काही ठिकाणी वाद वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीमधील वाद पुढे येताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. सध्या पक्षात होणाऱ्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात वाद निर्माण झाला आहे. तर, काही ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होतानाही दिसत आहे. यावर भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल
ठाण्यात शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना मोठा वाद झाला. भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. भाजपाकडून कोणतीही धमकी दिली गेली नाही. हे आमचे संस्कार आणि संस्कृती नाही, असे बावनकुळे यांनी नमूद केले. तसेच आम्ही भाजपा महायुती मिळून यावेळी मुंबईचा नक्कीच महापौर बनवणार आहोत. मुंबईची जनता विकासाच्या बाजूने आहे. विकास म्हणजे भाजपा आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र येऊन लढतील, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेसने राज ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी होणार की काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाविरोधी मतांच्या होणाऱ्या विभाजनाचा फायदा भाजपाला होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.