धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; आता करुणा मुंडेही मैदानात, थेट हायकोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:03 IST2025-01-07T14:02:34+5:302025-01-07T14:03:33+5:30
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; आता करुणा मुंडेही मैदानात, थेट हायकोर्टात धाव
Karuna Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीतील खंडणीसंदर्भातील आरोपामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंडे यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीची मालमत्ता तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या विविध खटल्यांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा दावा करुणा मुंडे यांच्या वकिलांनी केला आहे. याबाबत ४ जानेवारी रोजी कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवण्यासह करुणा मुंडे यांचा परळी विधानसभा निवडणुकीतील अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी दबाव टाकल्याचा आरोपही करुणा मुंडे यांच्या वकिलांनी केला असून याबाबत त्यांनी कोर्टात दाद मागितली आहे. करुणा मुंडे यांच्यामार्फत करण्यात आलेल्या या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, करुणा मुंडे यांच्या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधात विविध ठिकाणी खटले सुरू आहेत. मात्र या खटल्यांची माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा आरोप आहे.
करुणा मुंडेंचा निवडणुकीतील अर्ज कसा बाद झाला होता?
परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ५८ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परळीचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांच्याकडे दाखल केले होते. या ५८ उमेदवारांपैकी छाननी दरम्यान दहा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वेगवेगळ्या कारणाने अवैध ठरविण्यात आले. यामध्ये करुणा मुंडे यांच्या अर्जाचाही समावेश होता. करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्तीसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जामध्ये सूचकांच्या नावापुढे केलेल्या सह्या आपल्या नसल्याचे सूचकांनी नामनिर्देशनपत्र छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे करुणा मुंडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता.
दरम्यान, धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या गुडांनी सूचकांवर दबाव टाकून सही बनावट असल्याचा दावा करण्यास सांगितल्याचा आरोप आता करुणा मुंडेंकडून करण्यात आला आहे.