मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर, दररोज ७००-८०० कॉल करून अश्लील भाषेचा वापर; दमानियांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:50 IST2025-01-05T13:48:51+5:302025-01-05T13:50:20+5:30
वंजारी समाजाचा मुंडे कुटुंबाकडून वापर केला जात आहे, असा हल्लाबोल अंजली दमानिया यांनी केला आहे.

मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर, दररोज ७००-८०० कॉल करून अश्लील भाषेचा वापर; दमानियांचा आरोप
Anjali Damania: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये जाऊन आंदोलन करणाऱ्या अंजली दमानिया यांनी आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "मुंडे बहीण-भावाकडून वंजारी समाजाचा वापर होत आहे. मी परळीतील प्रशासकीय अधिकारी एकाच जातीचे असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला दररोज ७०० ते ८०० कॉल केले जात असून अश्लील भाषेचा वापर केला जात आहे," असा आरोप दमानिया यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषद केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये गेल्यानंतर मला परळीतील अधिकाऱ्यांबाबत माहिती मिळाली. मला असं कळलं की, अगदी गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून परळीतील सर्व महत्त्वाच्या प्रशासकीय पदावर वंजारी समाजातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मी संपूर्ण जातीविरोधात बोलले नव्हते. मात्र वंजारी समाजाचा मुंडे कुटुंबाकडून वापर केला जात आहे. माझ्याबद्दल फेसबुक पोस्ट करून माझा मोबाईल नंबर शेअर केला जात आहे. हे सर्व धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत," असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
"बीड जिल्ह्यात शासनाकडून जारी करण्यात आलेल्या बिंदू नामावली प्रमाणे अधिकाऱ्यांच्या नेमणुका होत नाहीत," असाही आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करावं, अशी मागणीही यापूर्वीच अंजली दमानिया यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आता मुंडे यांच्याकडून दमानिया यांना प्रत्युत्तर दिलं जातं का, हे पाहावं लागेल.