ठळक मुद्देनवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचं नातं कायम आहे.अंतर्विरोधाने भरलेलं सरकार देशाच्या इतिहासात कुठेच चाललेलं नाही, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.आमच्यावेळी 'मातोश्री'वरून आदेश निघायचा आणि आम्ही तो मान्य करायचो.

विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून झालेला वाद, युतीत पडलेली फूट, शिवसेनेनं नव्या मित्रांना सोबत घेऊन स्थापन केलेलं सरकार, सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागणं, या सगळ्या राजकीय घडामोडींनंतरही नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचं नातं कायम आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच आज त्याबाबत खुलासा केलाय. उद्धव ठाकरे सरकारला स्थिरस्थावर व्हायला वेळ देणार असल्याचं जाहीर करतानाच, शिवसेनेचे नवे मित्र त्यांना आधीसारखा सन्मान देत नसल्याची जाणीवही त्यांनी जाणीवपूर्वक करून दिली आहे. झी २४ तास वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सत्तापेच, सत्तास्थापनेचं नाट्य, राजकीय भूकंप, फसलेला गनिमी कावा, नवं सरकार, शिवसेनेची भूमिका यावर आपली मतं मांडली.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार किती दिवस टिकेल हे दाव्याने कुणीच सांगू शकत नाही. मला त्यावर काहीच दावा करायचा नाही. कारण, अंतर्विरोधाने भरलेलं सरकार देशाच्या इतिहासात कुठेच चाललेलं नाही, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादीचं ठीक आहे, ते कुठेही फिट होतात. सोयीप्रमाणे कुठलीही भूमिका घेतात. पण, शिवसेना आणि काँग्रेस हा केवढा अंतर्विरोध आहे बघा. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची अनेक भाषणं आज व्हायरल होत आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसबद्दल जी मतं मांडली आहेत, ती ऐकल्यावर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं?, असा प्रश्न त्यांनी केला. 

आमच्यावेळी 'मातोश्री'वरून आदेश निघायचा, अन्...  

शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येतील का, याबद्दल बोलण्यास देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. मात्र, भाजपा आणि शिवसेनेची युती ही नैसर्गिक युती होती. शिवसेना दूर गेली आम्ही नाही गेलो, असं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना किती अपमानित व्हावं लागेल, हे त्यांच्या नक्की लक्षात येईल, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. आमच्यासोबत असताना उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा जो सन्मान होता, तो आज आहे का? त्यांना कुणासोबत बसावं लागतंय, कुठे कुठे जाऊन चर्चा कराव्या लागताहेत, काय-काय सहन करावं लागतंय. आमच्यावेळी 'मातोश्री'वरून आदेश निघायचा आणि आम्ही तो मान्य करायचो, असं देवेंद्र यांनी आवर्जून सांगितलं. 

...पण नंतर धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही!

उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या मैत्रिपूर्ण संबंधांबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही माझे मित्र आहात, या सरकारला काही दिवसांचा वेळ दिला पाहिजे, असं मला उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. मी तो वेळ देणार आहे. काही दिवस चुकीचे निर्णय होतील, जनतेच्या विरोधातले निर्णय होतील त्यावर टीका नक्की करेन. वेळ जरूर घ्या, पण जनहिताचे निर्णय घ्या. ठरावीक काळानंतर ते होत नसेल तर मी धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही. माझा डीएनए विरोधी पक्षाचाच आहे. सरकार स्थापन झाल्यापासून निगेटिव्ह निर्णयाशिवाय यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. खातेवाटप नाही, मंत्रिमंडळ विस्तार नाही. म्हणजेच, वेळेचा सदुपयोग केला जात नाहीए, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिसीव्ह करण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते, तेव्हा त्यांच्याशी गप्पा झाल्या. कारण, राजकीयदृष्ट्या भूमिका बदलली असली, तरी वैयक्तिक संबंध त्यांनी किंवा मी संपवलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

 

Web Title: Devendra Fadnavis speaks about friendly relations with Uddhav Thackeray and shiv sena's new friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.