"मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं, पण जर कुणी..."; CM फडणवीसांचे रोहित पवारांना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:32 IST2026-02-11T13:31:38+5:302026-02-11T13:32:09+5:30
Devendra Fadnavis Rohit Pawar, Ajit Pawar Plane Crash: "भारताच्या चौकशी यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत"

"मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं, पण जर कुणी..."; CM फडणवीसांचे रोहित पवारांना उत्तर
Devendra Fadnavis on Rohit Pawar Allegations over Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या विमान अपघाताबाबत मंगळवारी त्यांचा पुतण्या आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शंका उपस्थित केली. त्यांनी काही दावे करत, हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला. तसेच या अपघाताची नीट चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. आज या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. शंका उपस्थित करण्यात काहीच गैर नाही, पण त्याचा राजकीय वापर करू नये, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "रोहित पवार काय बोलले ते मी ऐकलेले नाही. वेगवेगळ्या माध्यमांनी आणि व्यक्तींनी ज्या शंका उपस्थित केल्या, त्या त्यांनी मांडल्या. अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेची योग्यप्रकारे चौकशी व्हावी ही मागणी चुकीची नाही. रोहित पवार यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबत मी एवढेच म्हणेन की जर कोणाच्या मनात काही शंका असेल तर त्या शंकेचे निरसन व्हायला हवे."
तपास पूर्ण होऊ द्या !
"अशा प्रकारच्या अपघातांबाबत ज्या प्रकारच्या तपास यंत्रणा काम करायला हव्या आणि ज्या पद्धतीने तपास होणे गरजेचे आहे, त्यादिशेने योग्यप्रकारे तपास सुरू करण्यात आलेला आहे. डीजी सेफ्टी यांचा तपास हा सर्वात महत्त्वपूर्ण असतो. तो तपास सुरू आहे. ब्लॅक बॉक्सदेखील सापडला आहे. त्यावरून तपास करण्यात येत आहे. त्यामुळे हा तपास पूर्ण होऊन त्याचा काय निष्कर्ष निघतो, याची सर्वांनी वाट बघितली पाहिजे," असा सल्ला फडणवीसांनी दिला.
अपघाताच्या चौकशीची सर्वप्रथम मीच मागणी केली...
"या अपघाताची संपूर्णपणे नीट चौकशी आणि तपास व्हायला हवा अशी पत्र सर्वप्रथम मीच केंद्र सरकारला लिहिले होते या अपघाता दरम्यान नेमक्या काय चुका झाल्या याबाबत नीट माहिती हाती आल्यास भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळता येतील आणि त्या माध्यमातून केवळ नेता किंवा मंत्रीस नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या प्रवासासही सुरक्षितता मिळेल.
भारतातील चौकशी एजन्सी आंतरराष्ट्रीय स्तराच्या
"या अपघाताच्या चौकशीबाबत विशेष समिती गठीत करून चौकशी सुरू असल्याच्या बाबतचे पत्र मला केंद्रीय मंत्र्यांकडून आलेले आहे. चौकशी पूर्ण झालेली नसतानाच विविध तर्कवितर्क केल्याने लोकांच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. याबाबत तपास सुरू आहे. चौकशी करण्यात येत आहे. भारतातील तपास यंत्रणांवर कोणीही विश्वास अविश्वास दाखवू नये. आपल्या तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडील लोकांना तपास करण्यासाठी बोलावले जाते. त्यामुळे आपणही त्यावर विश्वास दाखवला पाहिजे. त्यामुळे शंका उपस्थित करणे चुकीचे नाही. फक्त कुठल्याही राजकीय हेतुने याचा वापर होणार नाही. आणि अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूबाबत कुठलेही राजकारण केले जाणार नाही याबाबत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे," असे फडणवीस म्हणाले.