सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:27 IST2025-11-28T17:27:25+5:302025-11-28T17:27:52+5:30
ST Bus Minister Pratap Sarnaik News: कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
ST Bus Minister Pratap Sarnaik News: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली. या भेटीदरम्यान शौचालय, पाणपोई सारख्या सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या प्रकरणी सोलापूर आगाराचे 'आगार व्यवस्थापक' यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता, तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून शौचालयाची डागडुजी करण्यात आली नव्हती. अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या. तसेच स्वच्छता ठेवण्यात आली नव्हती. जवळच असलेल्या पाणपोई परिसरात अत्यंत अस्वच्छता असल्याचे आढळून आले. पाणपोईच्या ५ नळांपैकी केवळ एकच नळ सुरू होता. या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना तात्काळ दिले.
विशेष म्हणजे मागील आठवड्यात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश आपल्या आकस्मिक पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी संबंधितांना दिले होते. याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च: तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर प्रवासी सुविधा मध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम भरला होता.
सोलापूर बस स्थानकावरील या गैरसोयीबद्दल कोणताही बदल स्थानिक प्रशासनाकडून करण्यात न आल्यामुळे नाईलाजाने संबंधित आगार व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्र्यांना द्यावे लागले आहेत. राज्यातील एसटीच्या २५१ आगार प्रमुखांनी या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पहावे आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये विशेषत: बसस्थानकावरील महिला प्रसाधनगृहाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.