‘वैद्यकीय’च्या पहिल्या वर्षीच्या अभ्यासक्रमाला दिरंगाईचे ‘सलाईन’; विद्यार्थी, पालक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:00 IST2025-08-16T11:59:57+5:302025-08-16T12:00:39+5:30
सातवेळा वेळापत्रक बदलून अखेर पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

‘वैद्यकीय’च्या पहिल्या वर्षीच्या अभ्यासक्रमाला दिरंगाईचे ‘सलाईन’; विद्यार्थी, पालक त्रस्त
अविनाश कोळी
सांगली : यंदा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला दिरंगाईचे सलाईन लावले गेल्याने एमबीबीएस दंतवैद्यकीय, आयुष व होमिओपॅथीच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या पूर्णत्वाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्रीय कोट्यातील पहिल्या फेरीचा निकाल सातवेळा वेळापत्रक लांबणीवर टाकून अखेर तीन दिवसांपूर्वी जाहीर झाला. सर्व फेऱ्या पूर्ण होऊन प्रवेश प्रक्रिया संपण्यास अजून बराच कालावधी लागणार आहे.
केंद्रीय व राज्य कोट्याच्या वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. १४ जून रोजी नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाल्याने ही प्रवेश प्रक्रिया पुढे आणखी किती महिने चालेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय कोट्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या पहिल्या फेरीचे वेळापत्रक मेडिकल कौन्सिलिंग कमिटीने तब्बल सात वेळा पुढे ढकलले. १३ ऑगस्टला पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला असून, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीची मुदत २२ ऑगस्टपर्यंत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राज्य कोट्याच्या जागांसाठीचा निकाल १३ ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना १४ ते २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे, त्यातही १५ व १६ ऑगस्ट रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
६४ हजारांवर विद्यार्थ्यांचे अर्ज
महाराष्ट्रातील वैद्यकीयच्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांतून ८ हजार १३८ तर दंत वैद्यकीयच्या २ हजार ७१८ जागांचे प्रवेश होणार असून ६४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेला आहे.
‘नीट’च्या निकालानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले असून, वारंवार मुदत वाढीमुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. प्रवेशाच्या अजून तीन ते चार फेऱ्या बाकी असून, आयुष अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेशानंतर महाविद्यालय कधी सुरू होणार आणि पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार, हा चिंतेचा विषय आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली