"सांगून पण सुधारणा दिसत नाही"; हिंदूंकडूनच खरेदी करा म्हणणाऱ्या संग्राम जगतापांना अजित पवार पाठवणार नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 14:09 IST2025-10-11T13:56:25+5:302025-10-11T14:09:58+5:30
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विधानावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

"सांगून पण सुधारणा दिसत नाही"; हिंदूंकडूनच खरेदी करा म्हणणाऱ्या संग्राम जगतापांना अजित पवार पाठवणार नोटीस
Ajit Pawar On Sangram Jagtap:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यांनी अडचणीत आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज दिल्यानंतरही संग्राम जगताप यांनी वक्तव्ये सुरुच ठेवली आहेत. मात्र आता अजित पवार यांनी संग्राम जगताप यांच्याविरोधात कडक पाऊल उचललं आहे. सोलापुरच्या एका सभेत केवळ हिंदूंकडूनच खरेदी करा असं विधान केलं. त्यानंतर आता अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचे म्हटलं.
सोलापूर इथल्या हिंदू आक्रोश मोर्च्यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीत फक्त हिंदू माणसालाच नफा झाला पाहिजे असं म्हटलं. त्याआधीही संग्राम जगताप यांना अजित पवार यांनी समज दिली होती. मात्र आता या विधानानंतर अजित पवार यांनी त्यांची भूमिका आणि विचार पक्षाला मान्य नसल्याचे म्हटलं.
"संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येय धोरणे ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर काही खासदार, आमदार किंवा संबधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्ये करत असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही," असं अजित पवार म्हणाले.
"खरंतर अरुणकाका जगताप जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत तिथं सगळं सुरळीत होतं. पण आता काही लोकांनी, आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या वडिलांचं छत्र आपल्यावर राहिलं नाहीये, त्यामुळे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सर्वांना पुढे घेऊन जाणारा आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हाही त्यांना (संग्राम जगताप) सांगितलं होतं. ते म्हणाले होते की मी यामध्ये सुधारणा करेन, पण सुधारणा करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची जी भूमिका आणि विचार आहेत ते पक्षाला मान्य नाही," असेही अजित पवार यांनी म्हटलं.
संग्राम जगताप काय म्हणाले?
"मी सर्वांना विनंती करेन दिपावलीच्या निमित्ताने खरेदी करताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा मिळेल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे, अशा प्रकारची दिपावली सर्वांनी साजरी करावी," असे संग्राम जगताप म्हणाले होते.